राज्यात गाजलेल्या नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्य खून प्रकरणाची सलग तिसऱ्या दिवशी नगर न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे माफीच्या साक्षीदाराची आज पुन्हा न्यायालयासमोर तपासणी झाली. यामध्ये माफीच्या साक्षीदाराने काही ठोस उत्तरे दिली. तर काही ठिकाणी त्याने आठवत नाही, असे सांगितले. पोलिसांनी आपल्याला कोणतेही लालूच दाखवलेले नाही, मी कोणत्याही दबावाला बळी पडलेलो नाही, असे सांगून मी माझ्या मनाने कबुली जबाब दिला आहे, असे न्यायालयासमोर स्पष्ट केले. दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी 6 जानेवारी 2025 रोजी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
राहुरी न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे अॅड. राजाराम जयवंत आढाव (वय – 52) व अॅड. मनीषा आढाव (वय – 42) यांच्या खून प्रकरणाची सुनावणी नगर येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर सुरू आहे. या प्रकरणात सरकारी साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे हा आरोपी आणि माफीचा साक्षीदार आहे. या प्रकरणात किरण नानाभाऊ दुशिंग, सागर साहेबराव खांदे, शुभम महाडिक, बबन सुनील मोरे हे आरोपी आहेत.
या घटनेतील माफीचा साक्षीदार हर्षल याची बुधवारी वकील सतीश वाणी यांनी उलटतपासणी घेतली. अॅड. वाणी यांनी हर्षल याला घटना घडल्यापासून तू कशा पद्धतीने वागला, तू कुठे-कुठे गेला होता. तुझ्यासमवेत कोण-कोण होते. तू घटना घडली त्यावेळेला कोणते कपडे परिधान केले होते. इतर आरोपींनी कोणते कपडे घातलेले होते. तुझ्या समवेत जो मोबाईल होता, तो किती वेळ सुरू ठेवला. घटना घडल्यानंतर तू फरार झाला होता. त्यावेळेला तू ज्या ज्या ठिकाणी गेला तेथे पोलीस ठाणे होते, तेथे तू जबाब किंवा मला या घटनेबाबत पश्चाताप होत आहे, अशी काही माहिती दिली का? यासह विविध प्रश्न हर्षल याला न्यायालयासमोर केले.
यावेळी उत्तर देताना हर्षल म्हणाला, मी आणि माझ्याबरोबर चार आरोपी गुन्ह्यामध्ये होते. मला पोलिसांनी सुरुवातीला नगर येथून ताब्यात घेतले. ते एलसीबीचे पोलीस होते, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर ते मला राहुरी पोलीस ठाणे येथे घेऊन गेले. तेव्हापासून आजपर्यंत मी राहुरी पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतच आहे. यावेळी जो जवाब दिलेला आहे, यासंदर्भात मी अगोदर पोलिसांना कोणतीच माहिती दिली नव्हती.
मी घटना घडल्यानंतर माझ्या गावातून पळून गेलो. त्यानंतर मी नगर येथे आलो. नेप्ती नाक्याहून कल्याणमार्गे बसने गेलो, कल्याण येथे पहाटे पोहोचलो. त्यावेळी माझा मोबाईल फोन पहाटे सहा वाजेपर्यंत बंद होता. त्यानंतर तो फोन चालू-बंद करत होतो. त्यावेळी वकील वाणी यांनी तेथे जवळ पोलीस स्टेशन होते का, असा प्रश्न केला. तू या गुन्ह्याबाबत मला पश्चाताप होत आहे असे त्यांना सांगितले का? त्यावेळी आरोपी हर्षल याने नाही म्हणून सांगितले. त्यानंतर मी पुन्हा नगरला आलो. तेव्हा मला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आणि राहुरीत आणले. यावेळी अॅड. सतीश वाणी यांनी त्याला कपड्याबाबत प्रश्न केला. तेव्हा पहिल्या दिवशी मी पिवळ्या रंगाचा लायनिंगचा शर्ट व फिकट रंगाची पॅन्ट घातली होती. दुसऱ्या दिवशी पांढरा रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट, तर तिसऱ्या दिवशी मी टी-शर्ट व जर्किन घातले होते. पुढे पाच दिवस मी तेच ठेवल्याचे त्याने न्यायालयासमोर सांगितले.
पोलिसांच्या ताब्यात असताना मला माझ्या घटनेचा पश्चाताप झाला हे मी राहुरी पोलिसांना सांगितले नव्हते, असे त्याने सांगितले. ज्यावेळी मला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले तेव्हा मी अर्धा तास अगोदर पोलिसांना कल्पना दिली होती. त्यानंतर माझ्यावर कोणताही दबाव नाही, मी स्वतःहून हे सर्व काही लिहून देत आहे, असे मी त्यावेळी सांगितले. सर्व घटनाक्रम मी न्यायदंडाधिकाऱ्यांना सांगत असताना तेथे इतर कोणीही नव्हते. फक्त एक टायपिस्ट होता व त्यांनी सर्व जबाब घेऊन घेतला व त्यानंतर मला तो सांगितला. त्यानंतर मी त्यावर स्वाक्षरी केली, असेही त्याने यावेळी न्यायालयासमोर सांगितले.
उलटतपासणी सुरू असताना आरोपीचे वकील वाणी यांनी, तुझा व या आरोपींचा कुठेही काही संबंध नाही, तुला पोलिसांनी आमिष दाखवले आहे, माफीचा साक्षीदार करतो व तुझी शिक्षा कमी करतो, असे सांगत त्यांनी तुला दमदाटी केली हे बरोबर आहे का, असे विचारल्यानंतर हर्षल याने, ‘असे काहीही झालेले नाही,’ असे न्यायालयासमोर सांगितले.
असे गमजे बाजारात भेटतात
या गुन्ह्यामध्ये पांढऱ्या रंगाचा गमजा काल दाखवलेला होता, तो आज उलटतपासणीत हर्षल याला ओळखण्यास सांगितला. यावेळी आरोपीचे वकील वाणी यांनी हा गमजा नवीन आहे. त्यावेळेस त्याने ‘नाही’ असे उत्तर दिले. तो वापरलेला आहे, असे सांगितले. यावेळी वकील वाणी म्हणाले की, असे गमजे क्ऱ्याच दुकानांमध्ये, रस्त्यावर मिळतात. यावर आरोपी हर्षल याने रस्त्यावर नाही तर दुकानात मिळतात, असे सांगितले. तरीही आपण हा गमजा ओळखत असल्याचे हर्षल याने न्यायालयाला सांगितले.
निकम सारखे उठतात; त्यामुळे गफलत होते – अॅड. वाणी
उलट तपासणीमध्ये आरोपीचे वकील वाणी यांनी ज्यावेळी माफीचा साक्षीदार हर्षल याला प्रश्न विचारला गेला किंवा दोन ते तीन प्रश्न एकत्र विचारल्यावर त्याला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आक्षेप घेतले. तर काही प्रश्न हे विनाकारण विचारत आहे, असे सांगितले. त्यावेळी न्यायालयाने हस्तक्षेप करत त्यांनी प्रश्न विचारला आहे, त्याला उत्तर देऊ द्या, असे सांगितले. त्यावेळी वकील वाणी म्हणाले, निकम साहेब उठल्यानंतर तो आरोपी मला काहीच आठवत नाही असे म्हणतो, असे म्हणताच न्यायालयामध्ये एकच हशा पिकला.