पालिकेकडून बांधकामांसह मेट्रो-बुलेट ट्रेनलाही दणका; दहा दिवसांमध्ये प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना करा अन्यथा काम बंद

मुंबईत प्रदूषण नियंत्रणाचे नियम मोडणाऱ्या 474 बांधकामांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यानंतर पुढील आठवडाभरात पालिकेकडून पुन्हा झाडाझडती घेण्यात येणार असून पूर्तता करण्यासाठी तीन दिवसांची अंतिम नोटीस देण्यात येणार आहे. या कालावधीत संबंधितांनी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना केल्या नाहीत तर ‘काम बंद’ची कारवाई होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही नोटीस बजावलेल्या आस्थापनांमध्ये इमरातींच्या बांधकामांसह रस्ते काम आणि मेट्रो-बुलेट ट्रेनचाही समावेश आहे.

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून हिवाळय़ात हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत सुरू असलेल्या पाच हजारांवर बांधकामांच्या ठिकाणाहून उडणारी धूळ हे प्रदूषणाचे प्रमुख कारण असल्याचा निष्कर्ष हवामान तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे गतवर्षी पालिकेने कठोर कारवाई करीत 15 ऑक्टोबर रोजी 27 प्रकारची नियमावली जाहीर केली आहे. या नियमांमध्ये वाढ करताना या वर्षी बांधकामांच्या ठिकाणी स्वयंपाक बनवण्यास, शेकोटी पेटवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. यानुसार पालिकेने यानुसार पालिकेच्या वॉर्ड स्तरावर सब इंजिनीयरच्या टीमच्या माध्यमातून बांधकामांची पाहणी करून प्रदूषण नियंत्रणाची नियमावली पाळण्यात आली नसल्यास कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचा वेग वाढवण्यात आला असून पालिकेने मुंबई सेट्रल आणि महालक्ष्मी दरम्यानच्या मेट्रो स्टेशन कामाला आणि बीकेसी येथील बुलेट ट्रेनच्या कामालाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अशा आढळल्या त्रुटी

  • पोल्युशन मॉनेटरिंग मशीनची कमतरता
  • माती-डेब्रिज लोडिंग करताना फॉगिंग बंद
  • बांधकामाजवळ वॉटर स्प्रिंकलरची कमतरता
  • बांधकामाजवळ पॉल्युशन मॉनेटरिंग रेकॉर्ड नाही
  • माती-डेब्रिजच्या गाडय़ांच्या चाकांची धुलाई बंद
  • इलेक्ट्रिक शेगडी उपलब्ध नाही, चुलीवर जेवण

अशी आहे नियमावली

  • संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपडय़ाने झाकलेले असावे, बांधकामाच्या ठिकाणी स्प्रिंकलर असावेत, धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान 4-5 वेळा पाण्याची फवारणी करावी, कामगारांना मास्क, चष्मा द्यावा.
  • धुळीने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान 35 फूट उंचीचे लोखंडी/पत्र्यांचे आच्छादन असावे.
  • रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अॅण्टी स्मॉग मशीन लावावीत. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी.