अदानींशी फडणवीस दीड तास बंद दरवाजाआड काय बोलले? महाराष्ट्रात संशयाचे वातावरण

उद्योगपती गौतम अदानी यांनी आज ‘सागर’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोघांमध्ये बंद दाराआड दीड तास चर्चा झाली. त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले हे गुप्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुपारी बाराच्या सुमारास अदानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सध्या वास्तव्य असलेल्या मलबार हिल येथील ‘सागर’ बंगल्यावर पोहोचले. अदानींची भेट पूर्वनियोजित नव्हती. ते फडणवीसांच्या भेटीला अचानक आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला उपस्थित राहू न शकल्याने शुभेच्छा देण्यासाठी अदानी आले असतील असे सांगितले गेले.

अदानींविरुद्ध अमेरिका सरकारने वॉरंट काढले आहे. त्याचा परिणाम आपल्या उद्योगावर होऊ शकतो. त्यामुळे तत्पूर्वीच राज्यातील मोठ्या प्रकल्पांचे मार्ग मोकळे करून ते कार्यान्वित करण्याचा अदानींचा प्रयत्न आहे. त्याबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या भेटीमध्ये धारावी पुनर्वसन प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.