सोनिवली येथील आदिवासी पाड्यामध्ये राहत असलेल्या एका कुटुंबातील दहा जणांना अन्नातून विषबाधा झाली, तर दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अंधश्रद्धेमुळे संपूर्ण कुटुंबाने उपचार घेण्यास नकार दिला. मात्र त्यांचे समुपदेशन केल्यानंतर सध्या सर्वांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले आहे. या कुटुंबातील चार वर्षांच्या दुसऱ्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
बदलापूरच्या सोनिवली परिसरातील आदिवासी पाड्यात गौऱ्या मिरकुटे हे आपल्या कुटुंबासह राहत असून मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करतात. गुरुवारी अचानक घरातील दहा जणांना विषबाधा झाली. कोणीतरी करणी केली असावी असा संशय वाटत होता. वेळीच औषधोपचार न मिळाल्याने सपना मिरकुटे या दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. दरम्यान, ही बाब आशा वर्कर ममता मेहेर यांना समजताच त्यांनी तातडीने मिरकुटे यांच्या घरी धाव घेतली.
मिरकुटे यांच्या घरातील सर्व सदस्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाली होती. सपना तर निपचित पडली. आमच्यावर कोणी तरी करणी केली आहे, असे वारंवार सांगितले जात होते, पण मेहेर यांनी सर्वांना समजावून सांगितले आणि तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधत समाजसेवक किशोर मेहेर यांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावली. त्यातून राज मिरकुटे, वैशाली मिरकुटे, गणेश मिरकुटे, मयुर मिरकुटे, कल्पना मिरकुटे, गोदी मिरकुटे यांच्यासह सर्वांना उल्हासनगरच्या रुग्णालयात दाखल केले. चार वर्षांची भारती मिरकुटे हिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कॉलरा, डायरिया की अन्य काही?
आदिवासी कुटुंबातील सर्व सदस्यांना झालेली विषबाधा ही अन्नातून झाली की, कॉलरा, डायरियामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनली अशी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र संपूर्ण अहवाल आल्यानंतरच खरे कारण स्पष्ट होईल, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.