>> दिलीप ठाकूर
चित्रपटसृष्टीच्या झगमगाटी, चकाचक क्षेत्रातील काही कलाकारांच्या आयुष्यातील तणाव, सुखदुःख, अपेक्षाभंग हे अनेकदा तरी दिसत नाहीत. अनेकदा तरी येथील कलाकारांच्या उंची जीवनशैलीतील त्यांची उंचावरची प्रशस्त घरे वा बंगले, त्यांच्या नवीन मॉडेलच्या गाड्या, रात्री उशिरापर्यंतच्या पेज थ्री पार्टीतील मोकळाढाकळा वावर हेच दिसत असते. सोशल मीडियाच्या युगात अनेक कलाकार आपल्या श्रीमंतीच्या थाटामाटाचे त्यातून दर्शन घडवतात. अशातच एखादा कलाकार एकाकीपणाने मानसिक दडपणात असतो, एखादी यशस्वी नवविवाहित अभिनेत्रीही कशावरून तरी दुखावलेली असते आणि अचानक एके दिवशी त्या कलाकाराच्या आत्महत्येची अतिशय धक्कादायक बातमी येते आणि सगळेच हादरून जातात.
दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री शोभिता शिवन्ना हिने वयाच्या अवघ्या एकतिसाव्या वर्षी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवावे या वृत्ताने दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीसह मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेकांना धक्का बसला. आज एका भाषेतील चित्रपट अन्य भाषेत डब होऊन अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत आणि सोशल मीडियाच्या युगात एका भाषेतील चित्रपटांची अन्य भाषेतील चित्रपट रसिकांनाही एका क्लिकसरशी माहिती मिळत असल्याने शोभिता शिवन्ना महाराष्ट्रीय चित्रपट रसिकांनाही ज्ञात आहेच. हैदराबाद शहरातील गचिबोवली भागातील काsंडपूर येथील आपल्या निवासस्थानी तिने 30 नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष उल्लेखनीय गोष्ट, 2023 च्या मे महिन्यात तिने सुधीर याच्याशी विवाह केला आणि ती संसारात सुखी असल्याचे तिच्या सोशल मीडियातील पोस्टवरून तरी दिसत होते. तरीही अचानक असे काय घडले की, तिने आपले आयुष्य संपवावे?
शोभिता शिवन्नाचा जन्म 23 सप्टेंबर 1992 रोजीचा कर्नाटकातील हसन तालुक्यातील सक्लेशपूर येथील. शालेय शिक्षण बाल्डवीन गर्ल्स हायस्कूलमध्ये घेतले. वयात येताच बंगलोर येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी येथे तिने फॅशन डिझायनर ही पदवी प्राप्त केल्यानंतर 2015 साली कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पहिला चित्रपट ‘रांगी तराना’. तो प्रदर्शित होतोय तोच शोभिता कन्नड चित्रपट व मालिकांमधून प्रचंड प्रमाणात कार्यरत झाली. ती यशस्वी अभिनेत्री म्हणून स्थिरावली. तिचा स्वतःचा खूपच मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. तिने भूमिका साकारलेल्या मालिकांत ‘मंगला गौरी’, ‘कृष्ण रुक्मिणी’, ‘गलीपटा’, ‘निड्डे गलीयू निड्डे’, ‘अमावस’ इत्यादींचा समावेश आहे. ‘ब्रह्मागंटू’ या दैनंदिन मालिकेमुळे ती मोठय़ाच प्रमाणावर लोकप्रिय झाली. त्याच वेळेस तिची भूमिका असलेल्या ‘जॅकपॉट’, ‘एटीएम’ ( अटेम्ड टू मर्डर), ‘इराडोनडला मोरू’ या कन्नड चित्रपटांतून ती लोकप्रिय ठरली आणि आता ती तेलुगू भाषेतील चित्रपटांतून भूमिका करण्यास इच्छुक होती. कारकीर्दीतील पुढची सकारात्मक पावले टाकत असतानाच शोभिता शिवन्नाने आत्महत्येचे पाऊल टाकावे हे अनाकलनीय आहेच, तसेच यशस्वी कलाकाराच्या खासगी वा व्यक्तिगत आयुष्यातील अशांततेची, एकाकीपणाची कल्पना येत नाही हेदेखील खरेच.
दुर्दैवाने अलीकडच्या काळात चित्रपट कलाकार, दिग्दर्शक यांच्या आत्महत्येच्या घटनांत वाढ होताना दिसतेय. यावरून या मनोरंजन क्षेत्राला अधिक प्रमाणात मानसोपचार तज्ञांची आवश्यकता आहे असा निष्कर्ष काढता येईल अथवा कलाकार व इतरांनी यश व नातेसंबंध यात जास्त अपेक्षा ठेवू नयेत असेही म्हणता येईल.