पोस्टल आणि ईव्हीएम मतदानात 15 टक्क्यांची तफावत कशी? शिवसेनेचा निवडणूक आयोगाला सवाल

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत पोस्टल मतदानात आघाडीवर असलेली महाविकास आघाडी ईव्हीएमवरील मतमोजणीत मोठय़ा फरकाने मागे पडली. हा ट्रेन्ड बदलला कसा, असा सवाल शिवसेना सचिव-आमदार वरुण सरदेसाई यांनी आज निवडणूक आयोगाला केला. पोस्टल टू ईव्हीएम मतांचे गणित बिघडले कसे त्याची आकडेवारीच मांडत व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठय़ांची मोजणी करण्याची मागणी त्यांनी केली.

वरुण सरदेसाई यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद बोलवून निवडणूक निकालाच्या आकडेवारीतील तफावत स्पष्टपणे मांडली. पोस्टल मतदानात महाविकास आघाडी राज्यात 143 जागांवर आघाडीवर होती तर महायुती 140 जागांवर आघाडीवर होती. पण ईव्हीएमचे निकाल बाहेर आले तेव्हा महाविकास आघाडी 143 वर आघाडीवर होती ती आश्चर्यकारकरीत्या 46 वर खाली गेली आणि महायुती 230 वर गेली. तसेच इतर पक्ष 5 ऐवजी 12 जागांवर आघाडीवर गेले. इतकी मोठी तफावत कशी होऊ शकते हा निवडणूक आयोगाला प्रश्न आहे, असे वरुण सरदेसाई म्हणाले. वरुण सरदेसाई यांनी या वेळी अनेक मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी सांगितली. ते आकडे निवडणूक आयोगानेच दिलेले आहेत, असेही ते म्हणाले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील आकडेवारीपासून त्यांनी सुरुवात केली. ते म्हणाले की, वरळी मतदारसंघात ईव्हीएमवर एकूण 141585 मतदान झाले. त्यात आदित्य ठाकरे यांना 62450 तर मिलिंद देवरा यांना 54001 मते मिळाली. पोस्टल बॅलेटमध्ये आदित्य ठाकरे यांना 874 तर देवरा यांना 522 मते मिळाली. एकूण 1716 इतके पोस्टल मतदान झाले. पोस्टल मतदानात आदित्य ठाकरे यांना 51 टक्के तर देवरा यांना 30 टक्के मते मिळाली. म्हणजेच पोस्टल मतदानात आदित्य ठाकरे 21 टक्क्यांनी पुढे आहेत. पण ईव्हीएमवरील मतदानात त्यांची मते 7 टक्क्यांनी कमी झाली तर देवरा यांची 8 टक्क्यांनी वाढली. त्यामुळे आदित्य ठाकरे 6 टक्क्यांच्या फरकाने विजयी झाले, असे सरदेसाई यांनी सांगितले.

वांद्रे पूर्व मतदारसंघातील स्वतःचा निकालही या वेळी सरदेसाई यांनी मांडला. पोस्टलमध्ये त्यांना 47 टक्के मतदान झाले तर विरोधक झिशान सिद्दिकी यांना 22 टक्के मते मिळाली. ईव्हीएमवरील मोजणी सुरू झाल्यानंतर झिशान यांची मते 12 टक्क्यांनी वाढली आणि सरदेसाई यांची कमी झाली. याबद्दलही सरदेसाई यांनी आश्चर्यवजा संशय व्यक्त केला. बाळापूर मतदारसंघात नितीन देशमुख यांना पोस्टलमध्ये 48 टक्के मतदान झाले तर मिंधे गटाच्या उमेदवाराला फक्त 23 टक्के मते मिळाली. ईव्हीएममध्ये मात्र देशमुख यांची मते 12 टक्क्यांनी घटली, मिंधे उमेदवाराची पाच टक्क्यांनी वाढली. पोस्टलमध्ये 25 टक्क्यांचा फरक असताना ईव्हीएममध्ये इतकी प्रचंड तफावत कशी, असा सवाल सरदेसाई यांनी केला. महाविकास आघाडीचे मराठवाडय़ातील उमेदवार प्रवीण स्वामी, कोकणातील भास्कर जाधव, खेळ-आळंदीतील बाबाजी काळे यांच्या मतदानाच्या आकडेवारीतही प्रचंड फरक असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

उद्धव ठाकरे यांना आकडेवारी सादर करणार

मतदानाच्या आकडेवारीतील या फरकाची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपण देणार असून त्यानंतर महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते पुढील भूमिका ठरवतील, असे सरदेसाई यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांचीच टक्केवारी घसरली

केवळ शिवसेनाच नव्हे तर महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या बाबतीतही असाच ट्रेन्ड दिसून आल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पोस्टल मतदानात 54 टक्के मते मिळाली आणि विरोधी उमेदवाराला फक्त 24 टक्के मते मिळाली. मग ईव्हीएममध्ये दोघांना समसमान मते कशी मिळतात. ईव्हीएमवर नानांची मते 13 टक्क्यांनी कमी झाली, असे सरदेसाई म्हणाले. अस्लम शेख आणि विश्वजीत कदम या कॉंग्रेस उमेदवारांचेही उदाहरण त्यांनी या वेळी दिले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इस्लामपूर मतदारसंघातील उमेदवार जयंत पाटील पोस्टलमध्ये 70 टक्के मते मिळवतात आणि त्यांचे विरोधक उमेदवार 28 टक्के मते मिळवतात. मग ईव्हीएममध्ये त्यांची मते कमी कशी होतात आणि केवळ साडेपाच टक्क्यांच्या फरकाने ते विजयी कसे होतात, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असेही सरदेसाई म्हणाले. पोस्टलमध्ये 60 टक्के मते मिळवणारे रोहित पवार यांचा ईव्हीएमच्या मोजणीत निसटता विजय होतो हे कसे झाले, असे काय घडले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडीने जिंकलेल्याच नव्हे, तर हरलेल्या जागांवरही हाच ट्रेन्ड बघायला मिळतो, याकडेही सरदेसाई यांनी लक्ष वेधले. अक्कलकुवा, बुलढाणा, चोपडा, घनसावंगी, पालघर, चेंबूर, संगमनेर, तिवसा, परतूर, कल्याण पूर्व आदी मतदारसंघाचे उदाहरण त्यांनी या वेळी आकडेवारीसह दिले.

पोस्टल टू ईव्हीएम एवढा मोठा फरक कसा पडतो?

आतापर्यंतच्या निवडणुकांतील मतदानाची आकडेवारी पाहिली तर हा ट्रेन्ड सारखा राहिलेला आहे. पण यंदाच्या निवडणुकीत असे नक्की काय घडले? सैनिक, वयोवृध्द, शासकीय कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी पोस्टल मतदान करतात. त्याच पोस्टल मतदानावर शिवसेनेने सिनेट आणि पदवीधर मतदारसंघाच्या जागा जिंकल्या, असेही सरदेसाई म्हणाले. पोस्टल टू ईव्हीएम अशी प्रत्येक जागी महाविकास आघाडीची 5 ते 15 टक्क्यांनी मते कमी झाली आणि महायुतीची तितकीच वाढली, असे ते पुढे म्हणाले.