छत्तीसगडमध्ये जवानांकडून सात नक्षलवाद्यांचा खात्मा, शोध मोहिम सुरूच

छत्तीसगडमधील मुलुगु जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि शस्त्रे जप्त केली आहेत. ठार केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये माओवाद्यांच्या एका प्रमुख नेत्याचाही समावेश असल्याचे कळते. मात्र पोलिसांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

इथुरुनाग्राममधील चालपाकाजवळील जंगल परिसरात सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली आहे. यादरम्यान नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करत गोळीबार सुरू केला. जवानांनीही याला प्रत्युत्तरादखल केलेल्या कारवाईत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. सुरक्षा दलाकडून अद्याप परिसरात शोध मोहिम सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मारले गेलेल्या काही नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. त्यापैकी कुर्सम मंगू उर्फ ​​बद्रू हा तेलंगणा राज्य समितीचा सदस्य आहे. तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात तो सक्रिय होता. याशिवाय मधू हा विभागीय समिती सदस्य तर मुचकी देवल हा क्षेत्र समिती सदस्य होते. कामेश, जयसिंग आणि किशोर हे पक्ष सदस्य होते.

छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील चालपाकाजवळील जंगल परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, जवानांनी परिसराला वेढा घालत नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. मात्र नक्षलवाद्यांनी जवांनावर गोळीबार सुरू केला. यामुळे जवानांनाही प्रत्युत्तरादाखल गोळीबार करावा लागला.