पोर्नोग्राफी प्रकरणी उद्योगपती राज कुंद्रा यांना ईडीचे समन्स, चौकशीसाठी मुंबई कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

पोर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावले आहे. कुंद्रा यांना या आठवड्यात चौकशीसाठी मुंबई कार्यालयात हजर राहण्याचे आदेश नोटीशीत देण्यात आले आहेत. ईडीने राज कुंद्रा आणि त्यांच्याशी संबंधित अन्य व्यक्तींच्या मुंबई आणि उत्तर प्रदेशातील काही शहरातील घर, कार्यालयांत छापेमारी केली. छापेमारीनंतर राज कुंद्रा यांना हे समन्स बजावले.

ईडीने पोर्नोग्राफीशी संबंधित इतर लोकांनाही समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी मुंबई कार्यालयात बोलावले आहे. राज कुंद्रा यांना सोमवारी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

राज कुंद्राचे वकील प्रशांत पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्या अशिलाने कोणाताही गुन्हा केला नाही. मी अद्याप माझ्या क्लायंटशी बोललो नाही, मात्र मी सांगू शकतो की ते निर्दोष आहेत. तसेच त्यांनी मनी लाँड्रिंगसारखा कोणताही गुन्हा केला नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो, असेही पाटील यांनी माध्यमांसमोर सांगितले.