बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल या चक्रीवादळामुळे उत्तर तमिळनाडूमधील चेन्नई आणि इतर अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळाचा जमिनीकडे येण्याचा वेग काही प्रमाणात कमी झाला आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता होती. मात्र, त्याचा वेग मंदावल्याने आता हे चक्रीवादळ रात्रीपर्यंत किंवा पहाटेपर्यंत किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार फेंगल चक्रीवादळ रात्री किंवा पहाटे पुद्दुचेरीजवळ किनारपट्टीला धडकेल आणि यावेळी वाऱ्याचा वेग ९० किमी प्रतितास असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चक्रीवादळाचा प्रभावामुळे तामिळनाडू आणि पद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. शनिवारी चेन्नई आणि परिसरातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. उत्तर चेन्नईमधील काथिवाक्कममध्ये सर्वाधिक 12 सेमी पावसाची नोंद झाली.हे चक्रीवादळ आज रात्री रात्री कराईकल आणि ममल्लापुरमच्या दरम्यानचा समुद्र किनारा ओलांडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या चक्वीदळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ जमीनीवर धडकल्यानंतर देखील पाऊस सुरूच राहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चेन्नई, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू, कांचीपुरम, विल्लुपुरम, कल्लाकुरिची आणि कुड्डालोर यासह पुद्दुचेरीसाठी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तमिळानाडूतील अंतर्गत भागांमधील रानीपेट, तिरुवन्नमलाई आणि नागापट्टिनमसह या जिल्ह्यांसाठीही हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, येथेदेखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. नागापट्टिनम आणि तिरुवरूर जिल्ह्यांमध्ये सुमारे ५०० लोकांना आश्रयस्थळी नेण्यात आले आहे. चेन्नई विमानतळावर दुपारपासून सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.