महाराष्ट्र विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर एक आठवडा उलटून गेला तरीही अद्याप सत्तास्थापनेसाठी दावा करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच राक्षसी बहुमतानंतरही राज्यात आनदोत्सव दिसत नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी महायुतीला टोला लगावला आहे.
भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे देवेंद्र फडणवसांना मुख्यमंत्री केलं जावं अशी मागणी होत आहे. फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद निश्चित मानलं जात असलं, तरी मंत्रिमंडळातील इतर खात्यांचं वाटप तिन्ही पक्षांमध्ये कसं करायचं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, लग्न ठरलंय, मुलाला मुलगी पसंत आहे. मुलीला मुलगा पसंत आहे. मात्र आता लग्नाच्या दिवशी मुहूर्तावर मुलगा लग्नास नकार देत आहे. कारण काय, तर मंत्रिपदाच्या रुपात मिळणारा हुंडा मनासारखा मिळत नाही. यात लग्नाला आलेले लोक (जनता) मात्र ताटकळत उभे आहेत. दुसरं काय बोलणार?, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
लग्न ठरलंय, मुलाला मुलगी पसंद आहे मुलीला मुलगा पसंद आहे, मात्र आता लग्नाच्या दिवशी मुहूर्तावर मुलगा लग्नास नकार देत आहे, कारण काय तर मंत्रिपदाच्या रुपात मिळणारा हुंडा मनासारखा मिळत नाही..
यात लग्नाला आलेले लोक (जनता) मात्र ताटकळत उभे आहे.दुसरं काय बोलणार!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 30, 2024
बहुमत असूनही सर्व चर्चा रखडली आहे ती मंत्रीपदासाठी अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच भाजप सर्व महत्त्वाची खाती स्वतःकडेच ठेवणार असल्याने आपल्या वाट्याला काय येणार, याची घटक पक्ष वाट पाहत आहेत. या घडामोडींवर रोहित पवार यांनी लग्नाची उपमा देत महायुतीला जबरदस्त टोला लगावला आहे.