कोणतीही पूर्वकल्पना न देता रेल्वे प्रशासनाने भाईंदरवरून सकाळी 8.24 ची सुटणारी साधी लोकल (नॉन एसी) रद्द करून एसी लोकल सुरू केली आहे. याशिवाय अनेक साध्या लोकलऐवजी एसी फेऱ्या वाढवल्या आहेत. याचा उद्रेक आज भाईंदर स्थानकात झाला. याविरोधात प्रवाशांनी आज भाईंदर स्थानकात स्वाक्षरी मोहीम राबवून स्टेशन मॅनेजरला फैलावर धरले.
भाईंदर रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे प्रवासी आज सकाळी 8.24 ची साध्या लोकलची वाट पाहत होते. मात्र एसी लोकल आल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. पूर्वकल्पना न देता साधी लोकल रद्द करून एसी लोकल चालवल्याने प्रवासी संतप्त झाले. सकाळी कामावर जाण्याची घाई त्यात रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आल्याने प्रवाशांनी हस्ताक्षर मोहीम राबवून रेल्वे प्रशासनाला धारेवर धरत निवेदन दिले.
मध्यमवर्गीयांचा विचार करा
भाईंदर स्थानकातून मोठ्या संख्येने चाकरमानी प्रवास करतात. यामध्ये मध्यमवर्गीय प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यांना एसी लोकलचा खर्च परवडत नाही. त्यामुळे एसी फेऱ्या जरूर वाढवाव्यात, मात्र साध्या लोकल रद्द करू नयेत अशी प्रवाशांची मागणी आहे.