मिळालेल्या एकतर्फी निवडणुकीत महायुतीला विजयाबद्दल सर्वांच्याच मनात शंका आहे. महाविकास आघाडीने ईव्हीएम हॅक झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. पुण्यात तर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे. यापाठोपाठ आता डोंबिवलीकरांनीही ईव्हीएमविरोधात उठाव केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सह्यांची मोहीम सुरू केली असून ईव्हीएम हटाव मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
डोंबिवलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांना प्रचारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. तरीही भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांचा विजय झाला. महायुतीच्या एकतर्फी विजयामागे ईव्हीएम मशीनमधील फेरफार कारणीभूत असल्याचा आरोप करीत शिवसेनेने ईव्हीएम मशीनविरोधात आंदोलन सुरू केले आहे. यासाठी डोंबिवली पश्चिमेत विविध ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. द्वारका हॉटेलजवळ दीनदयाळ रोड, स्टेशनसमोर गुप्ते रोड, पश्चिम शहर शाखा महात्मा फुले रोड अशा ठिकाणी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली.
नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद देत स्वाक्षऱ्यांद्वारे ईव्हीएमविरोधात आपला रोष व्यक्त केला. शिवाय आगामी सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी फक्त मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. या मोहिमेत दीपेश म्हात्रे, डोंबिवली शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, माजी शहरप्रमुख किशोर मानकामे, उपशहरप्रमुख सूरज पवार, उपशहर संघटक संजय पाटील, विभागप्रमुख राजेंद्र सावंत, नितीन पवार, शाम चौगले, राजेश पाटील, प्रवीण मिरकुट, युवासेनेचे अधिकारी ऋतुनील पावस्कर, आदित्य पाटील यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले.
फेरमतमोजणीसाठी पैसे भरले
डोंबिवलीत अनेक ठिकाणी झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मिळालेली मते यात मोठी तफावत आहे. हीच परिस्थिती पाहता दीपेश म्हात्रे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. ईव्हीएमवर संशय व्यक्त करत त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली असून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी 10 व्हीव्हीपॅट मशीनमधील मते पुन्हा मोजण्यासाठी अर्ज केला आहे. या प्रक्रियेसाठी लागणारी 4 लाख 72 हजार रुपयांची रक्कम त्यांनी भरली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांकडून पुढील दोन आठवड्यात मतमोजणीचे ठिकाण व तारीख निश्चित केली जाणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
लोकशाही टिकवण्यासाठी लढा
मतदान प्रक्रियेत गडबड होत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. लोकशाही टिकवण्यासाठी आणि जनतेच्या विश्वासाला धक्का लागणार नाही यासाठी आम्ही लढा सुरू केला आहे. ईव्हीएमविरोधातील शिवसेनेच्या आंदोलनाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून सह्याद्वारे ते रोष व्यक्त करत असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.