झोमॅटो फीड इंडिया कॉन्सर्टमुळे मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल, ‘या’ भागातील रस्ते राहणार बंद

झोमॅटो फीड इंडिया कॉन्सर्टमुळे शनिवारी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये अनेक रस्ते बंद राहतील. मुंबई वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात एक ॲडव्हायझरी जारी केली आहे. शनिवारी दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत अनेक रस्ते बंद राहतील, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले. भारत नगर जंक्शनपासून कुर्ल्याकडे जाणाऱ्या वाहनांना परवानगी दिली जाणार नाही. त्याऐवजी वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.

हे रस्ते राहणार बंद

कुर्ल्याकडे जाणारा संत ज्ञानेश्वर मार्ग, तसेच बीकेसीला जोडणारा खेरवाडी गव्हर्नमेंट कॉलनी ते वांद्रे येथील युटीआय टॉवर्सपर्यंतचा रस्ता बंद राहणार आहे. यासोबतच अंबानी स्क्वेअर, डायमंड जंक्शन, लक्ष्मी टॉवर आणि नाबार्ड जंक्शन येथेही प्रवेश प्रतिबंधित असेल.

वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॉन्सर्टमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, त्यामुळे सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि लोकांची गैरसोय कमी करण्यासाठी आम्ही हे रस्ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.