IPL 2025 च्या मेगा लिलाव प्रक्रियेमध्ये अनेक खेळाडू मालामाल झाले तर अनेक अनुभवी खेळाडूंना कोणत्याही संघ मालकाने खरेदी केले नाही. या खेळाडूंमध्ये मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकुरचाही समावेश आहे. शार्दुल अनसोल्ड राहिल्याने अनेक माजी खेळाडूंना आश्यर्याचा धक्का बसला होता. परंतु Syed Mushtaq Ali Trophy 2024 मध्ये शार्दुल ठाकुरचा खेळ त्याला अनसोल्ड का केलं हे दाखवून गेला. त्याने केरळविरुद्ध 4 षटकांमध्ये तब्बल 69 धावा दिल्या आहेत.
मुंबईविरुद्ध केरळ या सामन्यामध्ये केरळचे फलंदाज शार्दूलवर अक्षरश: तुटून पडले होते. चौकार आणि षटकारांची आतषबाजी केरळच्या फलंदाजांनी केली. शार्दूलच्या गोलंदाजीच खरपूस समाचार घेत त्याला 4 चौकार आणि खणखणीत 6 षटकार ठोकले. शार्दूलने आपल्या चार षटकांमध्ये तब्बल 69 धावांची लयलूट केली आहे. या सामन्यात मुंबईचा 43 धावांनी पराभव झाला आहे. या सामन्यात केरळच्या रोहित कुन्नूमल याने 7 षटकारांच्या मदतीने 87 धावा आणि सलमान नजीरने 8 षटकार ठोकत 99 धावांची तुफानी फटकेबाजी केली.
मुंबईकडे तगडे फलंदाज असतानाही संघावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. केरळने 235 धावांचे आव्हान दिले होते. धावांचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ (23 धावा) आणि श्रेयस अय्यर (32 धावा) स्वस्तात माघारी परतल्याने अजिंक्य राहणे याने 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी करत संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची विकेट गेल्यानंतर बाकीचे फलंदाज झटपट तंबूत परतले. त्यामुळे मुंबईला फक्त 191 धावांपर्यंत मजल मारता आली आणि 43 धावांनी संघाचा पराभव झाला.