…तर पुढील 20 वर्ष निवडणूक लढवणार नाही; निसटता पराभव झालेल्या नेत्याचं मोदींना चॅलेंज

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमवर पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान, जाहीर केलेली आकडेवारी आणि निवडणूक निकाल यामध्ये प्रचंड तफावत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. विरोधकांनी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचीही मागणी केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहाद अहमद यांनीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच चॅलेंज केले आहे. मोदींनी मतपत्रिकेद्वारे निवडणूक जिंकल्यास पुढील 20 वर्ष निवडणूक लढवणार नाही, असे आव्हान फहाद अहमद यांनी दिले आहे.

फहाद अहमद हे अणुशक्तीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढले. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर त्यांनी ईव्हीएमवर खापर फोडत त्याच्या पडताळणीची मागणी केली. या संदर्भातील फोटोही त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला.

फहाद अहमद यांच्या ट्विटला एका युजरने उत्तर दिले. त्याला फहाद अहमद यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. आधी तुमचे वडील नरेंद्र मोदी यांना मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास सांगा. जर ते जिंकले तर मी 20 वर्षे निवडणूक लढवणार नाही. राहिला प्रश्न तुम्ही ऑफर केलेल्या पैशाचा, तर आम्ही देश तोडणाऱ्यांचा पैसा घेत नाही, असे फहाद अहमद यांनी सुनावले.

निसटता पराभव

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत फहाद अहमद यांना अणुशक्तीनगर मतदारसंघात निसटता पराभव स्वीकारावा लागला. अजित पवार गटाच्या सना मलिक यांनी त्यांचा 3,378 मतांनी पराभव केला. फहाद अहमद हे सपामध्ये सक्रिय होते, मात्र निवडणुकीपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता.