भविष्यात भाजपे मिंधे आणि अजित पवारांचा गट फोडल्यास आश्चर्य वाटायला नको, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीपुढे माना झुकवून जी हुजुर करतात अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री ठरवण्यासाठी त्यांना बैठकांवर बैठका घ्याव्या लागतात. आता जर मुख्यमंत्री ठरवला असेल तर त्याचे आम्ही स्वागत करू. विधानसभेचे निकाल जरी आम्हाला मान्य नसले तरी लोकशाहीमध्ये आकडा महत्त्वाचा असतो. तो कसाही आणलेला असो. पुण्यात बाबा आढाव यांनी या निकालाविरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. 95 वर्षांचे गांधीवादी नेते रस्त्यावर उतरतात. अशा व्यक्तीला देशाच्या लोकशाहीसाठी, ईव्हीएमच्या घोटाळ्याविरोधात आंदोलन करावं लागतं यातच या निकालाचे रहस्य दडलेले आहे. महाराष्ट्रात हा समाज बाबा आढाव यांच्यामागे उभा राहिल असं चित्र दिसतंय असेही संजय राऊत म्हणाले.
स्वाभिमानाच्या गोष्टी या सरकारने करू नये
महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण असावं ? महाराष्ट्रातलं प्रशासन कसं असावं? मुंबईचा पोलीस संचालक कोण असावं? महाराष्ट्रातल्या नेत्यांकडे कोणती खाती असावीत? महाराष्ट्रातला कोणता व्यापार कोणी करावा हे सर्व दिल्लीतून मोदी शहा ठरवतात. आणि आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व हे त्यांच्यापुढे माना झुकवून उभे आहेत आणि जी हुजुर करत आहेत. आमची तीच भुमिका आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर महाराष्ट्रात ठरत नसेल तर एखाद्या राज्याच्या हितासाठी सरकार ठरवलं जात असेल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या गोष्टी या सरकारने करू नये.
तर आश्चर्य वाटायला नको
तीन पक्ष एकत्र आहेत, एका पक्षाला 50 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांना 40 पेक्षा जागा मिळाल्या आहेत, तर भाजपला 132 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पदांच्या वाटपाचा त्यांचा प्रश्न आहेत. एकनाथ शिंदे हे संरक्षणमंत्रिपदही, राष्ट्रपतीपदही मागू शकतात. त्यांच्या फार गोष्टी मनावर घेऊ नका. शेवटी दिल्लीने डोळे वटारले तर त्यांना गप्प बसावं लागणार आहे. मग ते अजित पवार असो वा एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रासाठीचा स्वाभिमान राहिलेला नाही. त्यांनी शरणागती पत्करलेली असून त्यांना हवं ते मागत आहेत. नाही मिळाले तर सरकारमध्ये पडून राहतील. भाजपकडून जी कामं यांच्याकडून करून घ्यायची होती ती झाली आहेत. त्यांनी महाराष्ट्र कमजोर केला, त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष तोडण्यास यांच्याकडून मदत घेतली. आता त्यांचं कार्य संपलं. भविष्यात त्यांचे पक्ष फोडले आणि भाजपने आपलं बहुमत सिद्ध केलं तर आश्चर्य वाटायला नको.
भलेही अण्णा हजारे झोपले असतील
बाबा आढाव हे गांधीवादी नेते आंदोलन करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने याची जाणीव ठेवायला पाहिजे. भलेही अण्णा हजारे झोपले असतील, अनेक लोकं जेव्हा क्रांतीची मशालं पेटवत असतील. पण लोकशाहीची मशाल विझू नये म्हणून बाबा आढाव यांच्यासारखा नेता उतरला आम्ही त्याची जाणीव ठेवतो.
अजित पवार हे कायम उपमुख्यमंत्री
अजित पवार हे कायम उपमुख्यमंत्री आहेत. ते भावी किंवा माजी नसतात, तर सदैव उपमुख्यमंत्री असतात. ही बाब कौतुकास्पद आहे. त्यांच्या चेहऱ्यावर जे मिष्किल हास्य आम्ही पाहतोय, गेले काही दिवस. हे हास्य लोकसभा निकालानंतर मावळलं होतं. पण या सगळ्यांनी ईव्हीएमची पुजा केली पाहिजे, ईव्हीएमची मंदिरं बांधली पाहिजे. यो लोकांनी एका बाजुला मोदी शहा आणि ईव्हीएमची अशी मंदिरं त्यांना बांधायची गरज आहे. म्हणजे यांच्या चेहऱ्यावरील हास्य कायम राहिल. मी परत सांगतो ईव्हीएमपेक्षा मोठा घोटाळा बाहेर येईल. बाबा आढाव ही एक सुरुवात आहे.
मतपत्रिकेवर मतदान घ्या
लोकसभेत महाविकास आघाडीला यश मिळालं होतं तेव्हाही आम्ही मतपत्रिकेवर मतदान घ्या अशी मागणी आम्ही केली होती. ईव्हीएमवर आम्ही जिंकू किंवा हरू आमची हीच मागणी आहे. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांना लोकसभेत यश मिळाले तरी त्यांची मागणी होती की मतपत्रिकेवर मतदान घ्या.