महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागला. अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये मतांच्या टक्केवारीमध्ये तफावत दिसून आली. काही ठिकाणी तर विजयी आणि पराभूत उमेदवारांना सारखीच मते पडल्याचा आरोप झाला. या विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रियाच संशयास्पद असल्याचे म्हणत काँग्रेसने 10 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान, जाहीर केलेली आकडेवारी आणि निवडणूक निकाल यामध्ये प्रचंड तफावत असून पारदर्शक निवडणुकीचा घोषा लावणा-या निवडणूक आयोगाकडूनच नियमांना हरताळ फासण्यात आल्याच्या शंका प्रसारमाध्यमे, विविध सामाजिक संस्था आणि संशोधन करणा-या व्यक्तींकडून उपस्थित केल्या जात आहेत, असे ट्विट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
निवडणूक आयोगाच्या संशयास्पद प्रक्रियेबद्दल काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न –
– मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोग दर दोन तासांनी जाहीर करत असलेल्या मतदानाच्या आकडेवारीचा रिपोर्ट अर्धा तास उशीराने का येत होता?
– संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान आणि रात्री साडेअकरा वाजेपर्यंत 65.2 टक्के मतदान कसे झाले?
– प्रत्येक व्यक्तीला मतदानासाठी साधारण एक मिनिटाचा कालावधी लागतो. याप्रमाणे मतदानाची अंतिम टक्केवारी आणि लागलेला वेळ यांची सांगड का बसत नाही?
– रात्री उशीरापर्यंत झालेल्या मतदानाच्या रागांची छायाचित्रे आणि व्हिडीओ फूटेजेस निवडणूक आयोगाने का प्रसिद्ध केली नाहीत?
– राज्यातील कोणकोणत्या मतदान केंद्रांवर रात्री उशीरापर्यंत मतदान सुरू होते?
– मतदानाच्या दुस-या दिवशी म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी 66.5 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी कशाच्या आधारावर जाहीर करण्यात आली?
– रात्री उशारापर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यासाठी इतका वेळ का लागला?
– 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 58.22 टक्के मतदान आणि 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 65.2 टक्के मतदान झाल्याच्या आकडेवारील 7.83 टक्के वाढ कशी झाली याचा खुलासा का करण्यात आला नाही?
– एकूण मतामध्ये 76 लाख मतांची वाढ कशी झाली?
– निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत का पोहचवली नाही?
सत्ताधाऱ्यांनाही EVM वर संशय; माजी मंत्र्यानं फेरमतमोजणीसाठी भरले पैसे, 1243 मतांनी झालेला पराभव
वरील सर्व प्रश्न आणि मतदारसंघनिहाय अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत. मतदानाची टक्केवारी, मतदान वाढ, मतांची गणना यामध्ये ताळमेळ बसत नसल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण का देण्यात आलेले नाही? लोकशाहीमध्ये लोकांची मते चोरण्याचे काम निवडणूक आयोगाने करता कामा नये आणि लोकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी पुराव्यासह सर्वांसमोर मांडावीत अशी आमची स्पष्ट भूमिका आहे, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट के.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद आहे. झालेले मतदान, जाहीर केलेली आकडेवारी आणि निवडणूक निकाल यामध्ये प्रचंड तफावत असून पारदर्शक निवडणुकीचा घोषा लावणा-या निवडणूक आयोगाकडूनच नियमांना हरताळ फासण्यात आल्याच्या शंका प्रसारमाध्यमे, विविध सामाजिक संस्था आणि…
— Nana Patole (@NANA_PATOLE) November 29, 2024