मुंबई-बंगळुरू प्रवास आता सहा तासांत, 29 किलोमीटर लांबीचा उरण-पागोटे-चौक सहा पदरी मार्ग 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जेएनपीए उरण पागोटे चिरनेर चौक असा 29 किलोमीटर लांबीचा ग्रीन कॉरिडॉर सहा पदरी महामार्ग प्रस्तावित केला आहे. येत्या तीन वर्षांत या रस्त्याचे काम पूर्ण होणार असून त्यासाठी साडेतीन हजार कोटींचा प्रस्ताव करण्यात आला आहे. हा रस्ता एनएच 66, एनएच 48 आणि एनएच 348 ला जोडण्यात येणार असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे आता मुंबई-बंगळुरू प्रवास आता सहा तासांत शक्य होणार आहे. तसेच हा महामार्ग तयार झाल्यानंतर सुरत- नाशिक – पुणे चेन्नईदरम्यान रिंग रोड तयार होणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई अटल सेतू, मुंबई – गोवा आपटा रसायनी जेएनपीएदरम्यान होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी हा प्रस्तावित रस्ता अगदी सुलभ, सोयीचा ठरणार आहे. पागोटे – चौकदरम्यान उभारण्यात हा महामार्ग गोवा आणि बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत मुंबईहून बंगळुरूदरम्यानचा प्रवास अगदी सहा तासांत करणे सहज शक्य होणार आहे. या पागोटे चौक ग्रीन कॉरिडॉर सहा पदरी महामार्गातील चिरनेर आणि आपटादरम्यान दोन ठिकाणी टनेल उभारण्यात येणार आहेत. चिरनेर टनेलची लांबी 1.9 किलोमीटर तर आपटा टनेलची लांबी 1.7 किलोमीटर असणार आहे. तसेच या मार्गावर सहा मोठे आणि पाच लहान पूल उभारण्यात येणार आहेत. त्याशिवाय सर्व्हिस रोड, स्लिप रोडचा समावेश करण्यात येणार आहे.

29.219 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित ग्रीन कॉरिडॉर सहा पदरी महामार्गाच्या प्रस्तावित कामाचे डीपीआर सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर लवकरच या कामासाठी निविदा मागवणार आहेत. वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर अवघ्या 30 महिन्यांच्या मुदतीत हे काम पूर्ण करावे लागणार आहे. या प्रस्तावित रस्त्यामुळे मार्गावरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.
 ■ यशवंत घोटकर, उपसंचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण