राज्यात थंडीचा कडाका सुरू; आठवड्याभरात हुडहुडी वाढणार

राज्यात थंडीचे आगमनाची जनता वाट बघत होती. आता राज्यात थंडी आली असून पुढील आठवड्याभरात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या जाणवत असलेली थंडी येत्या काही दिवसात हुडहुडी भरवणार आहे.

बंगालच्या उपसागराजवळ निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे येत्या आठवड्याभरात थंडी वाढण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे ताशी 25 ते 30 किमी वेगाने वाहणाऱ्या पूर्वीय वाऱ्यात मिसळून राज्यातील थंडीत वाढ होत आहे. तसेच उत्तरेवडील पर्वतीय प्रदेश आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढेल, त्याचा परिणामही राज्यातील वातावरणावर होणार असून थंडीत आणखी वाढ होणार आहे. उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, लेह-लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथेही तापमानात घट होत असून थंडीचा कडाका वाढत आहे. येत्या काही दिवसात उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

सध्या मुंबईसह कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान 28 तर पहाटेचे किमान तापमान 12 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत कमी झाले आहे. हे तापमान सरासरीपेक्षा दोन ते चार डिग्रीने कमी झाले आहेत. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक तर पश्चिम महाराष्ट्रातील नगर, पुणे मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर, अकोला या जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा 10 ते 13 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत घसरला आहे. मुंबईसह कोकणातील कमाल तापमान 30 तर किमान तापमान 14 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास आहे. येत्या आठवड्याभरात यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.