दुर्धर आजारावर उपचाराच्या नावाखाली साडेचार कोटींचा चुना

चार महिन्यांच्या बालकाला दुर्धर आजार असल्याचे भासवून उपचाराच्या नावाखाली साडेचार कोटी रुपयांची फसणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी एका अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवरून मदतीची पोस्ट करून मदतीचे आवाहन केले होते.

तक्रारदार माहीम येथे राहणारे असून त्यांच्या तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी तिघांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी चार महिन्यांच्या बाळावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे भासवले होते. जानेवारी महिन्यात त्याला सुरुवात झाली होती. त्या बाळाला स्पायनल मस्कुलर एट्रोपी हा आजार झाला असून त्याच्या वैद्यकीय खर्चासाठी 17 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे आरोपींनी भासवले होते. त्यासाठी एका अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम खात्यावरून 11 जानेवारीला स्टोरी बनवून नागरिकांना मदतीचे आवाहनही करण्यात आले होते. पण अशा प्रकारे मदतीचे आवाहन करून भामटय़ांनी साडेचार कोटी रुपये जमा करून ते उपचारासाठी वापरले नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.