ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा आरोप करत ही मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि पी.बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते, या अमेरिकन उद्योजक एलॉन मस्क यांच्या विधानाचाही संदर्भ याचिकाकर्त्याने या वेळी दिला. त्याचबरोबर 150हून अधिक देशांत बॅलेट पेपरद्वारे निवडणुका होतात, हेदेखील न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याचिकाकर्त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनीही ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केल्याचे न्यायालयाला सांगितले. यावर हे दोघेही जेव्हा हरतात तेव्हा ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित करतात आणि जिंकतात तेव्हा ते काहीच बोलत नाहीत, याकडे कसे बघायचे, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. जगापेक्षा तुम्हाला वेगळे का नकोय, असा सवालही न्यायालयाने केला.