EVM 99 टक्के चार्ज कसं? अभिनेत्री स्वरा भास्करला संशय, फेरमतमोजणीची मागणी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. काही मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले असून बहुतांश मतदारसंघात मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. या विधानसभा निवडणुकीत अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अमहदही निवडणुकीच्या मैदानात आहेत. मतमोजणीत फहाद अहमद हे पिछाडीवर असल्याने स्वरा भास्करने ईव्हीएमवरच संशय व्यक्त केला आहे.

फहाद अहमद हे अणुशक्ती नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांच्या विरोधात ते निवडणुकीत लढवत आहेत.

अणुशक्ती नगर मतदारसंघातून पती फहाद अहमद मागे पडताच स्वरा भास्करने ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त केला आहे. मतमोजणीत 19 पैकी 17 फेऱ्यांमध्ये ते आघाडीवर होते. मग दोन राऊंडमध्ये असे काय झाले की ते मागे पडले, असा सवाल स्वराने उपस्थित केला आहे. ज्या ईव्हीएम मशिनची बॅटरी 99 टक्के चार्ज झालेली आढळली, त्यात राष्ट्रवादीच्या उमेदवार सना मलिक यांना दुप्पट-तिप्पट मते मिळाली. दिवसभर चालणाऱ्या ईव्हीएम मशीन 99 टक्के चार्ज कशा राहू शकतात, असा प्रश्न स्वरा यांनी उपस्थित केला. फेरमतमोजणीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहित असल्याचे स्वरा भास्करने सांगितले.