मुंबईत भायखळय़ाची हवा सर्वाधिक प्रदूषित; बोरिवली, मालाड, बीकेसीमध्येही खराब हवा

मुंबईत थंडीची चाहूल लागल्याने उकाडय़ापासून काहीसा दिलासा मिळायला सुरुवात झाली असली तरी मुंबईच्या अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. भायखळय़ामध्ये हवेचा ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ (एक्यूआय) 301 म्हणजेच सर्वाधिक प्रदूषित झाला असून बोरिवली, मालाड पश्चिम, बीकेसी आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट भागातील हवेचा दर्जाही कमालीचा बिघडला आहे. यातच आगामी हिवाळय़ात आता हवेतील गारठा, आर्द्रता वाढल्याने मुंबईत प्रदूषण वाढण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे.

मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून हिवाळय़ात हवेची गुणवत्ता प्रचंड खालावण्याचे प्रकार घडत आहेत. समुद्रकिनारी आणि सात बेटांवर वसलेल्या मुंबईत हिवाळय़ात हवेची आर्द्रता वाढत असल्यामुळे बांधकामांमधून उडणारी धूळ हवेत जास्त वेळ थांबून राहत असल्यामुळे हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

गतवर्षी असे प्रकार वाढल्याने 23 ऑक्टोबर रोजी बांधकामांसाठी 27 प्रकारची नियमावलीही जाहीर केली आहे.

शुक्रवारच्या हवेची स्थिती

विभाग        एक्यूआय      दर्जा

भायखळा        301   अत्यंत खराब

बोरिवली पूर्व    217         खराब

मालाड पश्चिम 210         खराब

बीकेसी            216         खराब

एअरपोर्ट भाग  240         खराब

अशी ठरते हवेची गुणवत्ता

z हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ ‘एक्यूआय’ तपासला जातो. यामध्ये 0 ते 50 पर्यंत ‘एक्यूआय’ ‘अतिशय शुद्ध हवा’ मानली जाते.

z 51 ते 100 दरम्यान  ‘एक्यूआय’ – ‘समाधानकारक हवा’, 101 ते 200 दरम्यान ‘एक्यूआय’ z ‘मध्यम दर्जाची हवा’, 201 ते 300 पर्यंत ‘एक्यूआय’ – ‘खराब’ हवा समजली जाते.

z तर 301 ते 400 ‘एक्यूआय’ – ‘अतिशय खराब’, तर 401 ते 500 ‘एक्यूआय’ असल्यास ‘हवेची स्थिती गंभीर’ असल्याचे मानले जाते.