मिंधेंच्या खात्यात 74 कोटींचा घोटाळा कसला; आदित्य ठाकरे यांचा खळबळजनक आरोप

मिंधे-भाजप सरकारच्या काळात मुंबई महापालिकेसह राज्य सरकारचे मोठमोठे अनेक घोटाळे समोर आल्यामुळे करदात्या जनतेमधून प्रचंड संताप व्यक्त होत असताना आता खुद्द मिंधेंच्या नगर विकास खात्यातच तब्बल 74.41 कोटींचा ‘रंगरंगोटी’ घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. शेतकऱ्यावर अस्मानी संकटामुळे उपासमारीची वेळ आली असताना त्यांना मदत देण्यासाठी या सरकारकडे पैसे नाहीत. मात्र केवळ दिखाव्यासाठी मेट्रोच्या अर्धवट कामांची रंगरंगोटी करण्यासाठी चढय़ा दराने निविदा काढण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत, असा जबरदस्त टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागात झालेला घोटाळा आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उघड केला. मुंबई आणि परिसरात मेट्रोची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी ही कामे पूर्ण झालेली नसताना पिलर्स रंगवले जात आहेत. यासाठी चढय़ा दराने निविदा काढून तब्बल 74.41 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र सरकारने लक्षात ठेवावे, 23 तारीखला महाविकास आघाडीचे सरकार बनत आहे. या वेळी सगळ्या घोटाळ्यांची चौकशी केली जाईल आणि यामध्ये जे कुणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. सरकारकडे सामान्यांसाठी, शेतकऱयांसाठी पैसे नाहीत. मग हे पैसे कंत्राटदाराच्या खिशात जातात तरी कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

असा झाला घोटाळा

आदित्य ठाकरे यांनी 26/12/2022 रोजीची ‘एमएमआरडीए’ची दोन पत्रेच या वेळी दाखवली. मेट्रोच्या लाइनचे गर्डर टाकण्याआधीच रंगकाम केले जात आहे. मेट्रो – 2 अ आणि मेट्रो – 7 च्या रंगरंगोटीसाठी एमएमआरडीएने एक पत्र दिले आहे. त्यानंतर 4 ऑक्टोबरला चढय़ा दराने निविदा काढण्यात आली.

ज्यामध्ये मेट्रो पोल आणि इतर भागांची रंगरंगोटी करण्यात येईल, असे म्हटले आहे. यानुसार 74.41 कोटी रुपये काम होण्याआधीच रंगरंगोटीसाठी खर्च केले जात आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा रंगरंगोटी करणार. पुन्हा खर्च होणार. हा मोठा घोटाळा असल्याचे आदित्य ठाकरे या वेळी  म्हणाले.