जनतेच्या रुपाने आई अंबाबाईने मला सुरक्षा कवच दिलंय, मोदी शहा मला संपवू शकत नाही – उद्धव ठाकरे

भाजपने मला संपवायचा प्रयत्न केला. आजसुद्धा त्यांचा तो प्रयत्न चालला आहे. पण मी जो काही आहे ते तुमच्या भरोशावर आहे. तुम्ही जो पर्यंत साथ सोबत द्याल तोपर्यंत माझं अस्तित्व आहे. मोदी शहा मला संपवू शकत नाही. तुमच्या रुपाने आई जगदंबेने मला सुरक्षा कवच दिलं आहे, अशी भावनिक साद शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील सभेत घातली आहे. शिवसेना आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या विराट सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मिंधे भाजप सरकारची सालटी काढली.

”ऑपरेशननंतर थोडी अडचण होते नाहीतर धाराशिवकरांना मला दंडवत घालायचा आहे. तुम्ही तुमची निष्ठा ढळू दिली नाही. ओमदादा व कैलास यांचा मला अभिमान व कौतुक आहे. त्यांनी आपल्या धाराशिवच्या नावाला कलंक लागू दिला नाही. कैलासला घेऊन चालले होते. पण जाता जाता तो मला संपर्क करत होता. कसा आला काय आला त्याने तुम्हाला सांगितला आहे. हा सोन्याच्या लंकेपर्यंत पोहोचला होता. पण लंकेत गेला नाही कारण ती सोन्याची असली तर रावणाची आहे. रावणाची लंका जाळण्यासाठी शिवसेनेन मशाल हाती घेतली आहे. निष्ठा कधी विकली जात नाही. भाजपने मला संपवायचा प्रयत्न केला. आजसुद्धा चालला आहे. मी जो काही आहे ते तुमच्या भरोशावर आहे. तुम्ही जो पर्यंत साथ सोबत द्याल तोपर्यंत माझं अस्तित्व आहे. मोदी शहा मला संपवू शकत नाही. तुमच्या रुपाने आई जगदंबेने मला सुरक्षा कवच दिलं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”महायुतीचा थापानामा,जुमलानामा आला आहे. लोकसभा निवडणूकीत जनतेने यांच्या पेंकाटात लाथ मारल्यानंतर आता यांना जाग आली. आधी का नाही दिले महिलांना पैसे. पहिल्याच फटक्यात मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. सात जणांचे मंत्रीमंडळ असताना मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलं होतं. मी राजकारणी असतो तर मी सुद्धा थापा मारल्या असता. पण थााप मारणं माझ्या रक्तात नाही. जे करणार असेल तेच बोलेन आणि जे बोलेन ते करणारच. मोदी म्हणालेले शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, अच्छे दिन येतील पण अच्छे दिन कुणाचेच नाही आले. फक्त अदानीचे अच्छे दिन बाकींच्यांचे काळे दिन आलेयत’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

गद्दारांना पन्नास खोके देताना लाज वाटत नाही. पण माझा शेतकरी जो राब राब राबतो त्याच्या सोन्याची किंमत मातीमोल करता. आपले उमेदवारी राहुल बोंद्रे यांनी मला एक विचित्र गोष्ट सांगितली. चिखली नगरपालिकेने कचरा उचलण्याचे टेंडर काढले आहे. एक किलो कचरा उचलायचा 35 रुपये, सोयाबिन एक किलोला 30 रुपये. कचऱ्याला सुद्धा तुम्ही पिकवलेल्या सोन्यापेक्षा जास्त भाव देतायत. सोयाबिन पेक्षा कचरा महाग असेल तर सोयाबिन नेऊन टाका जिल्हाधिकाऱ्याकडे. जर माझ्या शेतकऱ्याने पिकवलेल्या सोन्याला कचऱ्या पेक्षा कमी भाव मिळत असेल तर हे अख्खं सरकार कचराकुंडीत टाकण्यासारखं आहे. द्या कचराकुंडीत टाकून. यांचा कचरा केल्याशिवाय हे जागे नाही होणार. सोयाबिनला भाव देत नाही. दुधाला भाव देत नाही. अन्नदाता देवो भवं म्हणता आणि देवाला भाव देत नाही. निवडणूका आल्यावर मंदिरात जाता हे थोतांड बंद करा आता. आम्ही शेतकर्‍याला हमी भाव देणार आणि पुन्हा कर्जमुक्त करणार’, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

”370 कलम हा महाराष्ट्रातल्या विधानसभेतला मुद्दा नाही होऊ शकत. काश्मीरचा मुद्दा होऊ शकतो. अमित शहांनी 370 कलम काढूनही शेतकरी आनंदात नाही. काश्मीरमधील 370 काढल्याने माझ्या महाराष्ट्रातील कापसाला भाव नाही मिळाला. कश्मीरमधलं 370 कलम काढलं म्हणून जे उद्योगधंदे गुजरातला पळवले ते नाही थांबले. महाराष्ट्रातल्या विधानसभेत काश्मीरच्या 370 कलम हटवल्याचा प्रश्न येतो कुठे. इथे लोकांच्या मुलभूत प्रश्नांबद्दल बोलायला हवे. कोरोना काळात तुम्ही सगळ्यांनी धीराने संकटाचा सामना केला. मी जे सांगत होतो ते ते तुम्ही करत होता. म्हणून महाराष्ट्र वाचला. त्यावेळी मोदी शहा भाजपने महाराष्ट्र नाही वाचला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

वर्सोव्यात आपला जो उमेदवार आहे हारुन खान. ते गेली 25 30 वर्ष झाली शिवसेनेत आहेत. त्याला पाडण्यासाठी फडणवीस तिथे गेले. तिथे जाऊन व्होट जिहाद करतायत त्यांच्या विरुद्ध धर्म युद्ध करा असं आवाहन त्यांनी केलं. माझ्या शिवसैनिकाविरुद्ध धर्मयुद्ध करताय तुम्ही. फडणवीस तुम्हाला लक्षात नसेल पण 2014 आणि 2019 साली तुमच्यासोबत मोदीजीं साठी जेव्हा मत मागत होतो तेव्हाही हा माझा सैनिक मत मागत होता. तेव्हा तुम्हाला धर्मयुद्ध नाही वाटलं का? फडणवीसांचा उदो उदो करत असेल तर तो नवाब मलिक, दाऊदही चालेल. पण जर तो आमच्याकडे असला तर तो देशद्रोही आहे. मी भाजपला लाथ मारलीय. पण हिंदुत्व मी कदापी सोडणारं आहे. भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं आहे व माझं हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं आहे. घराच्या होळ्या करून तुम्ही तुमच्या पोळ्या शेकताय. या चोरांच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान येतायत’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.