यशस्वीच्या भावाची तेजस्वी कामगिरी, रणजी करंडकात दमदार खेळीने सर्वांना केले प्रभावित

टीम इंडियाचा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वालचा मोठा भाऊ तेजस्वी जयस्वालने रणजी करंडकामध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन करत आपलं नाणं खणखणीत वाजवलं. त्रिपुराकडून खेळताना बडोद्याविरुद्ध त्याने 1 षटकार आणि 12 चौकारांची आतषबाजी करत संघासाठी महत्वपूर्ण खेळी केली.

रणजी करंडकात त्रिपुराविरुद्ध बडोदा या संघांमध्ये 6 नोव्हेंबर पासून सामना सुरू झाला आहे. यशस्वी जयस्वालचा मोठा भाऊ तेजस्वी जयस्वाल या सामन्यात त्रिपुरा संघाकडून मैदानात उतरला आहे. काहीच दिवसांपूर्वी 27 वर्षीय तेजस्वीचे रणजीमध्ये पदार्पण झाले आहे. त्रिपुरा संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 7 गड्यांच्या मोबदल्यात 482 धावा केल्या आहेत. तेजस्वीची लक्षवेधी खेळी संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यात महत्त्वपूर्ण ठरली. तेजस्वीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 159 धावांचा सामना केला आणि 12 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 82 धावा कुटून काढल्या आणि रणजी करंडकातील आपले पहिले अर्धशतक साजरे केल. मात्र, अवघ्या 12 धावांनी त्याचे शतक हुकले.

दरम्यान, बडोदा संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात 235 धावा केल्या होत्या. प्रत्त्युत्तरात त्रिपूरा संघाने 482 धावांचा डोंगर उभा केला आहे. बडोदा संघाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून त्यांनी बिनबाद 37 धावा केल्या आहेत.