देशाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड आज निवृत्त झाले. त्यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबरला संपत आहे. मात्र 9 आणि 10 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाची सुट्टी असल्याने आजचा दिवस त्यांचा शेवटचा कामकाजाचा दिवस ठरला. न्यायमूर्ती संजीव खन्ना आता देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या (AMU) अल्पसंख्याक दर्जाबाबत महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यांच्या नेतृत्वाखालील 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 4-3 च्या बहुमताने एएमयूचा अल्पसंख्याक दर्जा कायम ठेवला.
लास्ट वर्किंग डेच्या दिवशी सरन्यायाधीश यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत ते सगळ्यांचं अभिवादन स्वीकारताना आदराने मान खाली करत हात जोडलेले दिसत आहे. या फोटोत ते खूपच भावुक झाल्याचं दिसत आहेत. त्यांना आज सर्वोच्च न्यायालयात औपचारिक निरोप देण्यात आला.
यावेळी अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांच्यासह अनेक वकिलांनी ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे संबोधित केलं आणि न्यायव्यवस्थेतील त्यांच्या योगदानाविषयी बोलले. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी न्यायालयातील आपल्या शेवटच्या भाषणात सांगितले की, ‘जर माझ्याकडून कधी कोण दुखावलं असेल, तर मी माफी मागतो.’
दरम्यान, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ सुमारे दोन वर्षांचा होता, ज्यामध्ये त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. या निर्णयांमध्ये अयोध्येतील राम मंदिराचा निर्णय, इलेक्शन बॉण्ड नाकारणे, समलैंगिक विवाहाचा निर्णय संसदेवर सोडणे आणि कलम 370 हटवणे घटनात्मक असल्याचे घोषित करणे यांचा समावेश आहे.