”भ्रष्टाचाराच्या विळख्यातून महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपतींचा पुतळा सुद्धा सुटला नाही, अशा या दळभद्री भाजपला हद्दपार करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ज्योतिरादित्य शिंदे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी कर्जत जामखेड येथे एका प्रचार सभेत ते म्हणाले आहेत की, ”लोकांनी हे लक्षात घ्यावे की सद्या या फक्त निवडणुका नसून हे एक धर्मयुद्ध आहे आणि हे धर्मयुद्ध आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्य, शिकवण, आणि महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान यासाठी लढायचे आणि भ्रष्टाचारी पक्षांना हरवायचे आहे.” त्यांच्या याच वक्तव्यावर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत रोहित पवार म्हणाले म्हणाले आहेत की, ”ज्योतिरादित्य शिंदेसाहेब कर्जत जामखेडच्या पवित्र भूमीत येऊन जरी भाजपच्या स्टेजवरून बोलले असले तरी, कळत नकळत महाराष्ट्राच्या मनातील एक सत्य गोष्ट बोलून दाखवली. ते म्हणाले, ही निवडणूक नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, अभिमानाची आणि छत्रपतींच्या विचारांना, मूल्यांना जपण्याची, भ्रष्टाचारी पक्षांना हद्दपार करण्याची लढाई आहे.”
रोहित पवार पुढे म्हणाले, ‘शिंदेसाहेबांच्या या भूमिकेबाबत कोणाचेही दुमत नसेल, गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्वच महामानवांचा अपमान भाजपने केला, समतेची शिकवण देणाऱ्या महाराष्ट्रात द्वेषाचे विष पेरण्याचे काम केले, भ्रष्टाचाराच्या विळख्यातून तर महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपतींचा पुतळा सुद्धा सुटला नाही, अशा या दळभद्री भाजपला हद्दपार करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे.”
ज्योतिरादित्य सिंधिया साहेब कर्जत जामखेडच्या पवित्र भूमीत येऊन जरी भाजपच्या स्टेजवरून बोलले असले तरी कळत नकळत महाराष्ट्राच्या मनातील एक सत्य गोष्ट बोलून दाखवली ती म्हणजे “ही निवडणूक नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, अभिमानाची आणि छत्रपतींच्या विचारांना, मूल्यांना जपण्याची,… https://t.co/gcLXBSwLB6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 8, 2024