भोसरीत भाजपला गळती सुरूच

भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे आणि त्यांचे बंधू कार्तिक लांडगे यांच्या कार्यपध्दतीवर टीका करत भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे व संतोष लांडगे यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे, उमेदवार अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीत हा भाजप आणि आमदार महेश लांडगे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

भोसरी मतदारसंघातून यापूर्वी भाजपचे माजी नगरसेवक एकनाथ पवार, रवी लांडगे, वसंत बोराटे, संजय नेवाळे, लक्ष्मण सस्ते, भीमाबाई फुगे, प्रियांका बारसे आणि आता सारिका लांडगे यांच्या माध्यमातून भाजपला मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असलेले इनकमिंग व त्याचे ‘रिफ्लेक्शन’ विधानसभा निवडणुकीच्या निकालात नक्कीच पाहायला मिळेल, असा विश्वास महाविकास आघाडीच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.