भाजपप्रणित पेंद्र सरकारने सहा वर्षांपूर्वी तडकाफडकी रद्द केलेले कलम 370 पुन्हा प्रस्थापित करावे, या मागणीवरून जम्मू-कश्मीर विधानसभेत आज पुन्हा सभागृहात जोरदार गदारोळ झाला. गदारोळ करताना सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की करत कॉलर पकडली. शेवटी मार्शलकडून गदारोळ घालणाऱया भाजपच्या तीन आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.
पेंद्रातील भाजप सरकारने रद्द केलेले 370 कलम पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी सभागृह सुरू झाल्यावर अपक्ष आमदार शेख खुर्शीद यांनी आज हातात फलक घेऊन विधानसभेत प्रवेश केला. 370 कलम पुन्हा लागू करा आणि सर्व राजकीय पैद्यांची सुटका करा, अशी मागणी करणारा बॅनर घेऊन ते सभागृहाच्या वेलमध्ये उतरले. खुर्शीद यांच्याकडून बॅनर काढून घेण्यासाठी भाजपचे आमदारही वेलमध्ये उतरले. सज्जाद लोन, वाहीद पारा आणि काही नॅशनल कॉन्फरन्स सदस्यांनीही खुर्शीद यांना समर्थन दिले. त्यामुळे वेलमध्ये उतरलेले विरोधक भाजप आणि सत्ताधारी सदस्य एकमेकांना भिडले.
कलम 370 पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव मंजूर
जम्मू-कश्मीर विधानसभेने बुधवारी राज्याला विशेष दर्जा (कलम 370) पुन्हा बहाल करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. याला भाजप सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत प्रस्तावाच्या प्रती सभागृहात फाडून टाकल्या आणि अध्यक्षांविरोधात घोषणाबाजी करत गदारोळ घातला. याच मुद्दय़ावर आज खुर्शीद यांनी बॅनर झळकवला.