भाजपचा अजेंडा ‘बटेंगे तो कटेंगे’ नाही, तर हम महाराष्ट्र को लुटेंगे और हमारे दोस्तों को बाटेंगे! उद्धव ठाकरे यांचा घणाघात

जीवघेणी महागाई, प्रचंड भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि शेतकऱयांना वाऱयावर सोडणाऱ्या मिंधे-भाजप सरकार महाराष्ट्राच्या उन्नतीचे प्रकल्प गुजरातला पळवून महाराष्ट्र लाचार, भिकेपंगाल करायला निघाले आहे. ‘कटेंगे तो बटेंगे’ अशी नवी घोषणा देऊन आता हिंदू-मुस्लिमांमध्ये व जाती-धर्मांमध्ये तेढ, भांडणे लावायला निघाले आहे. मात्र भाजपचा अजेंडा ‘बटेंगे तो कटेंगे’ नाही, तर महाराष्ट्र को लुटेंगे और हमारे दोस्तों को बाटेंगे’ असा असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मात्र आम्ही आमचा महाराष्ट्र कधीही लुटू देणार नाही, तुटू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी हजारोंच्या जनसमुदायाने ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘महाविकास आघाडीचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या.

बाळापूर – नितीन देशमुख, बडनेरा – सुनील खराटे, दर्यापूर – गजानन लवटे, तिवसा – यशोमती ठाकूर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांचे झंझावाती सभा झाल्या. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना काळापासून तुम्ही दिलेल्या साथीमुळे मला तुम्ही कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. तुमच्या साथीमुळे ही जबाबदारी आपण पेलू शकलो. तुम्ही साथ दिली म्हणूनच कोरोना काळात महाराष्ट्र वाचला. त्यामुळे यापुढे केवळ मुख्यमंत्री म्हणून नाही तर महाराष्ट्राच्या हितासाठी जे जे काही सर्वोत्तम करायचे ते ते आपण कुटुंबप्रमुख म्हणून करणार. महाराष्ट्र ही माझी जबाबदारी आहे.

फडणवीसांच्या नागपूरमध्ये येणारा टाटा एअरबस प्रोजेक्ट गुजरातला गेला. तो वाचवायला हवा होता. विदर्भात रोजगार मिळणारे प्रकल्प गुजरातला पळवले. त्यामुळे फडणवीसांना नागपूर, विदर्भाची पर्वा नाहीय का, असा सवाल करतानाच याची फडणवीसांना लाज वाटत नाही का, असा टोलाही त्यांनी लगावला. तर आम्ही पुन्हा कर्जमाफी केली असती

महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही शेतकऱयांची कर्जमाफी करून त्यांच्या डोक्यावरील बोजा उतरवला. मात्र भाजप-शिंद्यांनी गद्दारी करून सरकार पाडले. मी मुख्यमंत्री असतो तर शेतकऱयांना पुन्हा एकदा कर्जमुक्त केले असते असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मी करून दाखवले असते. तेही वचन आता वचननाम्यात दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

ही निवडणूक महाराष्ट्रपेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही

विधानसभेची ही निवडणूक महाराष्ट्रपेमी आणि महाराष्ट्रद्रोही अशी आहे. पलीकडे महाराष्ट्रद्रोही आहेत. यांनी चांगले चाललेले सरकार गद्दारी करून पाडले. गद्दारी त्यांच्या रक्तात आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या हक्काचे गुजरातला नेताहेत, ओरबाडून नेताहेत. म्हणूनच मी मैदानात उतरलो आहे. या लढय़ात महाविकास आघाडी एकजुटीने लढत असल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचेही ते म्हणाले. लोकसभेत हे आपण दाखवून दिले. माजलेल्या सत्ताधाऱयाच्या बुडाखाली ठिणगी पेटवली. मात्र आव्हान अजून संपले नाही. यांची हवा काढायलाच हवी. हे काम पुन्हा करावे लागेल. यासाठी मला तुमचे आशीर्वाद आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्रातील सबकुछ मोदी असे होऊ देणार नाही

राजेंद्र गवई व्यासपीठावर आल्यामुळे जुने दिवस आठवल्याचे ते म्हणाले. बाळासाहेब आणि गवई एकाच व्यासपीठावर यायचे. त्यांनी मैत्रीत कधी राजकारण आणले नाही. आमचा घरोबा जुना आहे. दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असली तरी त्यात कधी राजकारण आणू दिले नाही. मात्र आता भाजप, मिंधेंचे उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे, महाराष्ट्रातले सबकुछ मोदी आणि जमीन आहे ती अदानीला. मात्र आम्ही असे होऊ देणार नाही. आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे. याच निवडणुकीत हे मनसुबे गाडून टाकून त्याच्यावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले का? सर्व उमेदवार मागे घेतो!

सरकार शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार होते. केले नाही. कापूस शेतात भिजून जातोय, मात्र सरकार भाव देत नाही. उत्पादन खर्च वाढला, मात्र उत्पन्न वाढले नाही. सरकारने म्हटले होते की, दुप्पट उत्पन्न करतो. मग शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट केले का? केले तर मी सर्व उमेदवार मागे घेतो असे खुले आव्हानच त्यांनी दिले. डाळींना भाव मिळत नसताना सरकार डाळी आयात करतेय. सोयाबीनला भाव नाही आणि परदेशातून तेल आणताहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

दिल्लीकडे हात पसरणारा महाराष्ट्र नको!

राज्यातील जनता मला कुटुंबप्रमुख मानते. त्यामुळे कुटुंबप्रमुख म्हणून मला माझा महाराष्ट्र स्वावलंबी हवा आहे. दिल्लीकडे हात पसरणारा नको, दिल्ली महाराष्ट्राकडे आली पाहिजे, असे उद्धव ठाकरे अमरावती येथील सभेत म्हणाले. महाराष्ट्र मला सर्वेत्तम बनवायचा आहे. आपले आदर्श, संस्कार पुसून टाकायचे आणि मोदी शहांचा आदर्श मानणार का? असा सवालही त्यांनी केला.

गाडगेबाबांची दशसूत्री हवी

संत गाडगेबाबा यांनी सांगितलेल्या दशसूत्रीप्रमाणे भुकेलेल्याला अन्न, तहाणलेल्या पाणी, घर, वस्त्र, निराश झालेल्यांना हिंमत, रुग्णांना औषधोपचार, तरुण-तरुणींचे लग्न आणि हाताला काम अशीच दशसूत्री सरकारची हवी. मात्र भाजप, मिंध्यांना चोरीची सवय आहे. चोरीचा मामला हळूहळू बोंबाला असे एकंदर असते. मात्र यांचे उलटेच आहे. ते म्हणताहेत, की चोरीचा मामला आणि मोठमोठय़ाने बोंबला. याचा शिवसेनेशी काय संबंध. आलास कुठून तू. आता तुला मोदींची खात्री राहिली नाही का? तुझा मोदींवर भरवसा नाही काय, असा टोलाही त्यांनी लगावत सगळ्यांच्या फोटोवर बाळासाहेबांचे फोटो आहेत असेही ते म्हणाले. अपक्षही त्यांचे फोटो लावताहे. मिंध्यांना बाळासाहेबांचा फोटो लावायला लाज नाही का वाटत, असा सवालही त्यांनी केल.

आम्ही करून दाखवतो आमचे सरकार असताना शेतकऱयांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी, शिवभोजन दहा रुपयांत करून दाखवलं. आपत्तीग्रस्तांना मदत करून दाखविली. परत कर्जमुक्त करून दाखवणार होतो. मात्र यांनी गद्दारी केली. खरे तर शेतकरी नसता तर कोरोना काळात आपण जिवंत राहिलो नसतो. शेतकऱयाने ऊन, वारा, पाऊस झेलत शेती केली. शेतकऱयांने वर्क फ्रॉम होम केले असते तर आपली बोंब झाली असली असेही ते म्हणाली. अन्नदात्याचे आपल्यावर उपकार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे आदींची उपस्थिती होती.

गद्दारी केवळ शिवसेनेशी नाही, तर महाराष्ट्राच्या मातीशी आणि मातेशी

आता ज्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी भाषण करण्याची गरज वाटत नाही. कारण निष्ठावंतांना गद्दारी माहिती आहे. त्यामुळेच तुम्हीच सगळे बोलता, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. जनताच बोलत आहे की, ‘पन्नास खोके, एकदम ओके’. त्यामुळे गद्दारांना गाढणारच. गद्दारी करून वार केलेली भळभळती जखम घेऊन अडीच वर्षे निवडणुकीची वाट बघत होतो. तो दिवस 20 नोव्हेंबरला आला आहे. त्या दिवशी गद्दारीचा सूड उगवायचा. कारण ही गद्दारी केवळ शिवसेनेशी नाहीय तर महाराष्ट्राच्या मातीशी आणि महाराष्ट्राच्या मातेशी आहे, असेही ते म्हणाले.

तर बदलापूरची माता ‘भाऊ’चे पायताणाने तोंड फोडेन

तिन्ही भाऊंकडून महाराष्ट्र ओरबाडताना महिला, मुली, चिमुरडय़ांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाहीय. बदलापूरमध्ये तर शाळेत चिमुरडीवर अत्याचार झाले. तिच्या आईच्या तक्रारीची दखल घ्यायला कुणी तयार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामांचा अभिमान असेल तर बदलापूरमध्ये अत्याचार झालेल्या चिमुरडीच्या मातेला जाऊन पंधराशे रुपयांची मदत द्या. चिमुरडींनाही कुठली सुरक्षा मिळत नसेल तर ही मदत काय चाटायची आहे का, असा सवालही त्यांनी केला. तिन्ही भावांनी तोंड दाखवायचे असेल तिला भेटून सांगा, मी तुझा भाऊ, पंधराशे घ्या. ती पायताणाने तोंड फोडेल, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला. अशी नाटपं, थोतांड याआधी कुणी बघितली नाही, असेही ते म्हणाले.

तर मोदींना दिल्ली दिसली नसती

छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी बांधलेला किल्ला आजही अभिमानाने उभा आहे. मात्र तुम्ही राजकोटवर भ्रष्टाचार करून अशुभ हातांनी पुतळा उभारल्याने तो पडल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवराय आमचे दैवत, स्फूर्तिस्थान आहेत. त्यामुळेच आम्ही प्रत्येक जिह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार. हे दैवत नसते तर मोदी तुम्ही दिल्ली बघितली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला. राजकोटचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान मोदींनीही माफी मागितली. मात्र फडणवीसांनी माफी मागितली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता मोदींच्या फोटोवर मते मिळत नाहीत म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा फोटो लावत असल्याचा टोलाही त्यांनी लगावतानाच महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी समोरच्या गद्दाराला गाडा असे आवाहनही केले.

आपण तिघे भाऊ भाऊ, महाराष्ट्र लुटून खाऊ

एकतर गद्दारांनी आम्हाला पाच वर्षे पूर्ण करू दिली नाहीत. अडीच वर्षांत जी कामे आम्ही केली त्याची कधी शोबाजी केली नाही. कारण कर्जमुक्ती म्हणा पिंवा अजून काही निर्णय, मी माझे कर्तव्य पार पाडले. तुमच्यावर उपकार केले नाही. मी कधी येऊन अहंकार नाही दाखवला. शेखी मिरवली नाही. आज देवा भाऊ, दाढी भाऊ आणि जॅकेट भाऊ यांचे ‘आपण तिघे भाऊ भाऊ, महाराष्ट्र लुटून खाऊ,’ असा प्रकार सुरू असल्याचा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.

विदर्भातली मुले गुजरातला कामाला जाणार का?

विधानसभेत विदर्भाने आतापर्यंत भाजपला भरपूर आमदार, खासदार दिले. मात्र भाजपने तुम्हाला काय दिले, असा सवाल त्यांनी केला. आम्ही पिण्याचे पाणी दिले, सिंचनाचा अणुशेष भरून काढला. मी तर ठरवले होते गोसीखुर्दचे पाणी पश्चिम विदर्भात आणायचे आणि आजूबाजूच्या परिसराला पिण्याचे पाणी द्यायचे.मात्र ह्यांनी सरकार पाडले. इथे येणारे प्रकल्प गुजरातला नेले. आता का विदर्भातली मुले गुजरातला कामाला जाणार का?. तुमच्या योजना तुम्हाला लखलाभ होवो, असा टोलाही त्यांनीही लगावला. शेतकरी भिक नाही हमीभाव मागतो. आम्ही सोयाबिनला दहा-बारा हजार भाव दिला. कापसाला भाव दिला. मात्र आता खोटय़ांचा बाजार भरला आहे. हे विदर्भ खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. विधानसभा निवडणुकीत मिंधे किंवा भाजपचा एकही आमदार निवडून येता कामा नये. फक्त शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी घटकपक्षांचे आमदार विजयी करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अडीच वर्षे उबवलीत का?

गद्दारी करून सरकार पाडल्यानंतर चांगले काम केले असते तर तुम्हाला आता थापा माराव्या लागल्या नसत्या. आता सांगता कर्जमाफी देणार. मग अडीच वर्षे उबवलीत का, असा टोलाही त्यांनी लगावला. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाच वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवले. आमचे सरकार आल्यास बळीराजाचे कोणतेही नुकसान न होऊ देता तेल, साखर, डाळ, तांदूळ, गहू अशा पाच वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

बाळापूर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नितीन देशमुख यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दणदणीत जाहीर सभा झाली. या सभेला विराट जनसागर लोटला होता.

शिवरायांचे मंदिर संस्कारपीठ असेल

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा राजा. संकटाचा सामना करणारा, महिला-भगिनींचा आणि गरीबांच्या भाजीच्या देठाचाही सन्मान त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवतच आहेत आणि म्हणूनच प्रत्येक जिह्यात त्यांचे मंदिर आम्ही बांधणार आहोत. हे केवळ मंदिर नसेल तर एक संस्कारपीठ असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.