विधानसभा निवडणुकीसाठी 17 नोव्हेंबर रोजी दादर येथे शिवतीर्थावर सभेसाठी शिवसेनेने परवानगी मागितली आहे, परंतु अद्याप ती मिळालेली नाही. 17 नोव्हेंबरला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मरणदिनही आहे. त्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर येतील. त्यामुळे संघर्षाची ठिणगी पडायची नसेल तर शिवसेनेच्या सभेला परवानगी द्या, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज निवडणूक आयोग आणि पोलिसांना दिला.
‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा प्रकाशित केला. त्याप्रसंगी पत्रकारांनी यंदाच्या निवडणुकीतही शेवटची जाहीर सभा शिवतीर्थावर होणार की नाही असे विचारले होते. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या आडमुठेपणावर टीका केली.
शिवसेनाप्रमुखांना वंदन करायला शिवसैनिक येणार, त्यांना कोणी अडवू शकत नाही
उद्धव ठाकरे म्हणाले की, 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर सभेसाठी शिवसेनेने परवानगी मागितली आहे. त्या दिवशी शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिनही आहे. लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी दरवर्षी येतात आणि याही वर्षी येणार. त्यामुळे निवडणूक आयोग आणि पोलिसांनी तिथे आडमुठेपणा करू नये. शिवसैनिकांना शिवतीर्थावर यायला कुणी अडवू शकत नाही. त्यांना निवडणूक आचारसंहिता लागू शकत नाही आणि कुणी लावू शकत नाही. सर्व शिवसैनिक शिवतीर्थावर येणार. त्यामुळे संघर्षाची ठिणगी पडू द्यायची नसेल तर छत्रपती शिवाजी महाराज मैदान 17 नोव्हेंबरला शिवसेनेच्या सभेसाठी मिळावे ही मागणी मान्य करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.