ऑस्ट्रेलियाला पंतच्या आक्रमक खेळाची भीती

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर येणाऱ्या हिंदुस्थानी संघातला आक्रमक फलंदाज ऋषभ पंतबाबत यजमानांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलिया रणनीती आखत असल्याचे कर्णधार पॅट कमिन्सने सांगितले. पंत हा प्रतिभावान आणि आक्रमक फलंदाज आहे. गेल्या वेळी त्याच्याच खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला मायदेशात पराभूत करण्याची किमया करून दाखवली होती. त्यामुळे आगामी मालिकेत आम्ही पंतला रोखण्यासाठी सज्ज असल्याचे कमिन्स म्हणाला.

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार सुरू होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी दोन्ही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. मायदेशात न्यूझीलंड विरुद्धची मालिका 3-0 ने गमावल्यानंतर हिंदुस्थानचा कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीचा प्रवास अधिक खडतर झाला आहे. इतरांच्या निकालावर अवलंबून न राहता कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी हिंदुस्थानला ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका 4-1 ने जिंकावी लागणार आहे. त्यामुळे या मालिकेतील हिंदुस्थानच्या कामगिरीकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

कमिन्स म्हणाला, हिंदुस्थान हा एक चांगला प्रतिस्पर्धी संघ आहे. हिंदुस्थानात अनेक प्रतिभावान खेळाडू असून, त्यांना रोखण्यासाठी विविध उपाययोजना आम्ही आखत आहोत. गेल्या वेळी ऋषभ पंतच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले होते. दुखापतीनंतर संघात पुनरागमन केलेला पंत अधिक धोकादायक झाला आहे. पंत हा असा खेळाडू आहे जो नेहमी सामन्याची गती वाढवतो. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी आम्ही विशेष योजना आखत आहोत.

दुखापतीनंतर कसोटीत पुनरागमन केल्यापासून पंत जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने 5 सामन्यांत 46.88 च्या सरासरीने 422 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एका शतकी आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने सहा डावांत 261 धावा केल्या.