आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंचा ‘पंगा’ हा काही नवा नाही. अनेकवेळा काही खेळाडू आपल्याच संघातील सहकाऱ्यांबरोबर हुज्जत घालत असल्याच्या घटना घडतात. गल्ली क्रिकेटला साजेसा तमाशा वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाला. वेस्ट इंडिजचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ यांच्यात मैदानातच बाचाबाची झाली आणि वाद इतका विकोपाला गेला की, जोसेफने थेट मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार शाय होप आणि स्टार गोलंदाज अल्झारी जोसेफ यांच्यात क्षेत्ररक्षणावरून मैदानातच काहीसा वाद झाला. जोसेफ गोलंदाजी करत असताना होपने लावलेल्या क्षेत्ररक्षणाच्या मुद्दय़ावरून जोसेफ चांगलाच भडकला होता. जोसेफ स्लिपमध्ये उभ्या असलेल्या खेळाडूला इशारे करत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण या खेळाडूने जोसेफचे काही ऐकले नाही. त्यानंतर जोसेफने या षटकात विकेट घेतली आणि नंतर मैदान सोडले. जोसेफ मैदानाबाहेर गेल्यामुळे वेस्ट इंडिजचे दहा खेळाडू क्षेत्ररक्षण करताना दिसले. हे चित्र पाहून प्रशिक्षक डॅरेन सॅमी हैराण झाला.
कार्टी इंग्लंडच्या काळजात घुसला
आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशानंतर फिल सॉल्ट (74), सॅम करन (40), डॅन मुसली (57) यांची दमदार फलंदाजी आणि तळाला जॅमी ओव्हरटन आणि जोफ्रा आर्चर यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने 8 बाद 263 अशी मजल मारली होती, पण वेस्ट इंडिजच्या ब्रॅण्डन किंग आणि किसी कार्टीने इंग्लिश गोलंदाजीला अक्षरशः पह्डून काढत 43 व्या षटकातच संघाच्या मालिका विजयावर आपले नाव कोरले. इविन लुईस लवकर बाद झाला, मात्र त्यानंतर किंग आणि कार्टीने 28 चौकार आणि 3 षटकारांची बरसात करत इंग्लंडचा पराभव निश्चित केला. दोघांनी आपापली वैयक्तिक शतके साजरी करत संघाचा विजयही साजरा केला. किंगने 102 धावांवर बाद होण्यापूर्वी दुसऱ्या विकेटसाठी 209 धावांची भागी रचली. कार्टीने शेवटपर्यंत धुवाधार फटकेबाजी करत 114 चेंडूंत 128 धावा ठोकल्या. त्याच्या आरपार फलंदाजीमुळे इंग्लंड विंडीजमध्ये मालिका पराभवाला सामोरे जावे लागले.