सीमेवर पाकिस्तानी अतिरेक्यांच्या सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याबाबत हिंदुस्थानने निर्माण केलेला दुरावा अद्याप संपण्याची शक्यता नसल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनाबाबत झुकण्याची तयारी केली आहे. हिंदुस्थान पाकिस्तानात खेळणार की नाही, याबाबत बीसीसीआयकडून कोणतेही स्पष्टीकरण न आल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतील हिंदुस्थानच्या लढती यूएईत खेळविण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. याचाच अर्थ गेल्या वर्षी आशिया चषकाप्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफीतही हायब्रिड मॉडेल वापरण्याची मानसिक तयारी पीसीबीने सुरू केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात लवकरच बदल करून तो जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.
हिंदुस्थान आणि पाकिस्तानात राजकीय संबंध अस्थिर असल्यामुळे हिंदुस्थानी संघाला पाकिस्तानात खेळण्याची परवानगी कठीण मानली जात आहे. गेले काही महिने पीसीबी हिंदुस्थानी संघाने पाकिस्तानचा दौरा करावा म्हणून प्रयत्न करतेय, पण त्यांचा प्रयत्न अद्याप कोणत्याही पद्धतीने यश लाभलेले नाही. गेल्या वर्षी आशिया चषकाच्या आयोजनादरम्यानही हीच स्थिती होती. त्यामुळे हिंदुस्थानच्या लढती श्रीलंकेत खेळविल्या गेल्या होत्या. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामता पीसीबीने हिंदुस्थानी सरकारने क्रिकेट संघाला पाकिस्तानात खेळण्याची परवानगी न दिल्यास कार्यक्रमात बदल करण्याची मानसिकता केली आहे. त्यांनी हायब्रिड मॉडलचा प्रस्ताव आयसीसीला आधीच पाठवला आहे. येत्या 11 नोव्हेंबरला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या कार्यक्रमाची घोषणा करावी, अशी इच्छा आहे. पर्यायी कार्यक्रम आधीपासूनच तयार असल्यामुळे संभाव्य कार्यक्रम जाहीर करण्यात विलंब केला जाऊ नये, असे पीसीबीचे मत आहे. मात्र पीसीबीला बीसीसीआयकडून आपल्या संघाच्या खेळण्याबाबत सरकारकडून परवानगी आहे की नाही, याचे पत्र हवे आहे. पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करताना हिंदुस्थानच्या सर्व लढती लाहोरमध्ये खेळवण्याची योजना केली होती.