वडाळ्यात आमदार विरुद्ध माजी महापौर लढत 40 वर्षांची मक्तेदारी मोडण्यासाठी नव्या चेहऱयाला संधी

>> राजेश चुरी

झोपडपट्टीवासीयांपासून मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय असा संमिश्र लोकवस्तीचा म्हणून ओळखला जाणारा वडाळा विधानसभा मतदारसंघ हा वडाळय़ापासून अगदी दादर पूर्वेकडील हिंदू कॉलनी, पारसी कॉलनीपासून दादर पश्चिमेच्या काही भागांपासून थेट प्रभादेवी मंदिरापर्यंत पसरलेला आहे. या भागात जुन्या चाळींच्या प्रश्नांपासून बीडीडी चाळी, पोलीस वसाहत, सहकार नगर झोपडपट्टय़ा, पाणी आणि पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या निवडणुकीच्या प्रचारात हे मुद्दे प्रकर्षाने पुढे येणार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेच्या श्रद्धा जाधव, भाजपचे कालिदास कोळंबकर आणि मनसेच्या स्नेहल जाधव व अन्य असे नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कालिदास कोळंबकर हे सुमारे 40 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत, पण पुनर्विकासाचे प्रश्न वर्षानुवर्षे तसेच प्रलंबित आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पाला चालना दिली आणि इमारतींचे बांधकाम सुरू झाल्याने बीडीडी चाळीतल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला.

z या विभागातील असंख्य प्रकल्प रखडले आहेत. अण्णाभाऊ साठे नगरमध्ये असंख्य अडचणी आहेत. या ठिकाणी एसआरए प्रकल्प झाला, पण अजून 25 ते 30 कुटुंबांना घरेच मिळालेली नाहीत. ममता सोसायटीचा पुनर्विकास झाला, पण बिल्डरने फसवल्याची रहिवाशांची भावना आहे.

z विद्यमान आमदारांसमोर माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. कोळंबकर हे 40 वर्षे आमदार आहेत, तर श्रद्धा जाधव या 30 वर्षे नगरसेविका होत्या. त्यात अडीच वर्षे महापौरपद भूषवले आहे. नगरसेवक असताना लोकविकासाची असंख्य कामे त्यांनी केलेली आहेत. त्यांचा तळागाळातल्या सर्वसामान्य मतदारांशी थेट संपर्क आहे. त्यामुळे मतदार श्रद्धा जाधव यांच्या रूपाने नव्या चेहऱयाला विधानसभेत पाठवण्याच्या तयारीत आहेत.

z विद्यमान आमदारांनी 40 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, पण विकासच केला नाही अशी या भागातील रहिवाशांची तक्रार आहे. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला होता. लोकसभा निवडणुकीत वडाळय़ात शिवसेनेच्या अनिल देसाईंना 70 हजार 931, तर शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंना 61 हजार 619 मते मिळाली होती.