मुंबईतील (Mumbai) बीकेसीही (BKC) येथे बुधवारी महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) सभा पार पडली. या सभेत महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी आपला ‘पंचसूत्री’ वचननामा जायीर केला. याच वचननाम्याची आता भाजपने धास्ती घेतल्याचं दिसत आहे.
आज महाविकास आघाडीच्या गॅरंटीच्या विरोधात वर्तमानपत्रांमध्ये पेड आणि निनावी जाहिराती छापून आल्या. या विरोधात आता काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली, याबाबत स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत माहिती दिली आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
‘एक्स’वर पोस्ट करत नाना पटोले म्हणाले आहेत की, ”महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही काल मुंबईतील महाराष्ट्र स्वाभिमान सभेत लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केली. महाविकास आघाडीने मांडलेली महाराष्ट्रहिताची ‘पंचसूत्री’ महिला, शेतकरी, तरुणांचा सर्वांगीण विकास साधेल.”
ते म्हणाले, ”महाराष्ट्राला उत्कर्षाच्या शिखरावर नेणाऱ्या गॅरंटीच्या विरोधात आज वर्तमानपत्रांमध्ये पेड आणि निनावी जाहिराती छापून आल्या आहेत. याविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.”
पटोले पुढे म्हणाले की, ”कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये आमच्या गॅरंटीची तरतूद अर्थसंकल्पांमध्ये केलेली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आम्ही अभ्यास करूनच लोकहिताच्या गॅरंटी दिल्या आहेत. खोटं बोलणे ही भाजपची वृत्ती आहे. म्हणूनच आमच्या गॅरंटीला घाबरलेल्या भ्रष्टयुतीने आज तातडीने खोट्या जाहीराती छापून आणल्या. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासोबत तडजोड करणाऱ्या कर्तव्यशून्य भ्रष्टयुती सरकारला महाराष्ट्रातील जनता हाकलून लावणारच.”