सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडल्यानेच शरद पवारांबद्दल खालच्या पातळीवरची टीका: नसीम खान

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल माजी राज्यमंत्री व भाजपा आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेली टीका अत्यंत खालच्या पातळीवरची असून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. शरद पवार यांच्याबद्दल गलिच्छ भाषा वापरणारे सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नसीम खान यांनी म्हटले आहे.

माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबद्दल वापरलेल्या भाषेचा तीव्र शब्दात निषेध करून नसीम खान म्हणाले की, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख यांच्यापासून सर्वच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात विकासाचे राजकारण केले आहे. राज्याची प्रगती कशी करता येईल यावर त्यांनी भर दिला. विरोधकांवर टिका करतानाही तारताम्य बाळगण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे पण सदाभाऊ खोत यांच्या सारखे काही लोक वरिष्ठ नेत्यांबद्दल बोलतानाही अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरतात हे चुकीचे आहे. राज्याच्या विकासात सदाभाऊ खोत यांचा काहीही वाटा नाही, विधानसभा निवडणुकीत जनता अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही नसीम खान यांनी दिला आहे.