देवेंद्र फडणवीस हतबल झाले आहेत…; जयराम रमेश यांची खरमरीत टीका

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप प्रत्यारोपांचा फैरी झडत आहेत. सत्ताधारी महायुतीच्या मनमानी कारभारावर महाविकास आघाडीने हल्लाबोल केला आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हतबल झाल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी शहरी नक्षलवाद्यांचा पाठिंबा घेण्यासाठी ‘लाल संविधान’चा उपयोग केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, “फडणवीस ज्या पुस्तकावर आक्षेप घेत आहेत ते हिंदुस्थानचे संविधान आहे. ज्याचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे तेच संविधान आहे जे मनुस्मृतीला प्रेरित नसल्याचे सांगून नोव्हेंबर 1949 मध्ये RSS ने टीका केली होती. हे हिंदुस्थानचे तेच संविधान आहे, ज्याला नॉन-बायोलॉजिकल प्रधानमंत्री बदलू पाहत आहेत.” असे म्हणत जयराम रमेश यांनी फडणवीस यांच्यासह प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्यावर निशाना साधला.

“जोपर्यंत शहरी नक्षलवादाचा संबंध आहे, केंद्रीय गृह मंत्रालयाने 11 मार्च 2020 आणि 9 फेब्रुवारी 2022 रोजी संसदेत सांगितले आहे की, हिंदुस्थान सरकार हा शब्द वापरत नाही. त्यामुळे फडणवीसांनी आधी विचार करावा आणि मग बोलावे”, असे म्हणत जयराम रमेश यांनी देवेंद्र फडणवीच यांचे कान टोचले आहेत.