तोंडचे पाणी पळविणाऱ्यांना आता पाणी पाजणार

सत्ताधाऱ्यांनी आमच्या तोंडचे पाणी पळवले आहे. पाण्यासाठी आम्ही मोठा संघर्ष केला असला तरी या भागाला मुबलक पाणीपुरवठा करण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमच्या हक्काचे पाणी पळवणाऱ्यांना पाणी पाजल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार आडीवली, पिसवली आणि ढोकळी परिसरातील महिलांनी केला आहे. या महिलांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भोईर यांच्यामागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचे पारडे जड झाले आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना महाविकास आघाडीचे सुभाष भोईर, मनसेचे राजू पाटील, मिंधे गटाचे राजेश मोरे, अशी तिरंगी लढत होत आहे. राजू पाटील हे या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे. खोके सरकारने या भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. उलट या भागातील नागरिकांच्या हक्काचे पाणी बिल्डरांना विकले. त्यामुळे मिंधे गट आणि मनसेच्या उमेदवारांना संपूर्ण मतदारसंघात रोषाचा सामना करावा लागत आहे. आडीवली, पिसवली आणि ढोकळी परिसरात शिवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांच्या प्रचार फेरीत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. या भागाचे पाणी पळवून बिल्डरांच्या घशात घालणाऱ्यांना निवडणुकीत पाणी पाजण्याचा निर्धार त्यांनी केला. महिलांच्या या निर्धारामुळे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची एकच पळापळ उडाली आहे.

या प्रचार रॅलीमध्ये काँग्रेसचे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे, तालुकाप्रमुख मुकेश पाटील, समाजवादी पक्षाचे शिवसागर यादव, माजी सरपंच बळीराम भाने, विजय भाने, माजी सरपंच राजेश फुलोरे, सुखदेव पाटील, माजी सरपंच सुजाता पाटील, हनुमान पाटील, गजानन भाने, बाळाराम पवार, चंद्रकांत पवार, रोहिदास पवार, योगेश भाने, संदीप भाने, मधुकर भाने, कृष्णा भाने, सुरेश पवार, कुमार पवार, त्रिंबक पवार, गुरुनाथ पवार आदी सहभागी झाले होते.