माथेरानच्या राणीची शीळ दऱ्याखोऱ्यांत गुंजली

बच्चेकंपनी ते आजी-आजोबांपर्यंत सर्वांची लाडकी असलेली माथेरानची राणी पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा नटून थटून सज्ज झाली. आज निसर्गरम्य डोंगरदऱ्यांतून शीळ घालत ती डौलत निघाली तेव्हा पर्यटकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. टॉय ट्रेनचे चालक आणि स्टेशन व्यवस्थापक यांच्या हस्ते इंजिनची पूजा करण्यात आली. सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी नेरळ स्थानकावरून माथेरानच्या दिशेने पहिली टॉय ट्रेन धावली आणि राणीची शीळ दऱ्याखोऱ्यांत गुंजली. असंख्य पर्यटकांनी माथेरानच्या राणीतून प्रवास करण्याचा आनंद मनसोक्तपणे लुटला.

सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेले माथेरान हे थंड हवेचे प्रसिद्ध हिल स्टेशन असून नागमोडी वळण घेणारी टॉय ट्रेन पर्यटकांना येथील निसर्गाचा आनंद देते. माथेरानमधील पर्जन्यमान हे सर्वाधिक असून याच डोंगरकड्यात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी वाहते. या काळात दरड, झाडे कोसळण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करूनच रेल्वे विभाग दरवर्षी माथेरान टॉय ट्रेन बंद ठेवते. 8 जूनपासून सुरक्षेच्या दृष्टीने नेरळ-माथेरान टॉय ट्रेन सेवा रेल्वे प्रशासनाने बंद केली होती. केवळ अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू होती.

15 ऑक्टोबरपासून नेरळ-माथेरान सेवा सुरू होईल अशी शक्यता होती. मात्र रुळांच्या डागडुजीची कामे अपूर्ण असल्याने 1 नोव्हेंबरपासून मिनी ट्रेन सेवा सुरू करण्याचे संकेत मध्य रेल्वे प्रशासनाने दिले होते.

माथेरानची राणी आजपासून धावणार ही आनंदवार्ता समजल्याने रेल्वेचे अधिकारी व कर्मचारीदेखील आनंदित झाले होते. रेल्वेच्या वतीने पहिल्या फेरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. लाडकी टॉय ट्रेन आता नियमितपणे धावणार असल्याने पर्यटनालाही चालना मिळेल असा विश्वास स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. आजपासून पर्यटकांची संख्या वाढल्याने माथेरानमधील व्यावसायिकांच्या खिशात चार पैसे खुळखुळणार आहेत.

पहिल्या दिवशी 111 तिकिटांची विक्री

पहिल्याच दिवशी ट्रेनची एकूण 111 तिकिटांची विक्री झाली. त्यामध्ये द्वितीय वर्ग डब्याची 90 तिकिटे तर प्रथम वर्ग डब्याची 21 तिकिटे अवघ्या काही तासांत संपली, तर दुसऱ्या ट्रेनसाठी पर्यटकांनी तत्काळ रांगा लावल्या. एनडीएम 405 हे इंजिन जोडून टॉय ट्रेन माथेरानच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी मोटरमन भानुदास ठाणगे, गार्ड सुनील पाटील, वरिष्ठ शाखा अभियंता संजीव कुमार, शरद सानप, उप स्टेशन मॅनेजर राहुल कुमार, दगडू आव्हाड, स्टेशन व्यवस्थापक गुरुनाथ पाटील उपस्थित होते.