पनवेल रेल्वे स्थानक कात टाकणार

प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर रेल्वे स्थानकांचे अपग्रेडेशन सुरू आहे. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील स्थानकाचा समावेश आहे. यामुळे पनवेल रेल्वे स्थानक कात टाकणार असून पुनर्विकास करताना पर्यावरणपूरक कामे केली जाणार आहेत.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशभरातील 76 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. निवड झालेल्या 76 स्थानकांपैकी 7 स्थानकांच्या सॉफ्ट अपग्रेडेशनची कामे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच समाविष्ट झालेल्या तीन स्थानकांसाठी जळगाव, अक्कलकोट आणि पनवेल येथील प्राथमिक कामे हाती घेत आहेत. मध्य रेल्वेने प्रमुख अपग्रेडेशन कामासाठी आणखी 16 स्थानके निवडली आहेत. यामध्ये दादर, ठाणे, ठाकुर्ली, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस-एलटीटी, लोणावळा, भुसावळ, अकोला, अमरावती, खंडवा, नाशिक रोड, वर्धा, पुणे, मिरज, शिवाजीनगर आणि साईनगर शिर्डी यांचा समावेश आहे.

सुशोभीकरण होणार

पनवेल स्थानकात प्राधान्याने पर्यावरणपूरक बिल्डिंग बांधले जाणार आहे. आधुनिक आणि आकर्षक डिझाईन असेल. याशिवाय स्थानक परिसरात स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल. प्लॅटफॉर्मच्या भिंतीवर मनमोहक लॅण्डस्केपिंग केले जाणार आहे.