‘रामायण’ दोन भागांत प्रदर्शित होणार

रणबीर कपूर आणि साई पल्लवी स्टारर चित्रपट ‘रामायण’च्या घोषणेची प्रतीक्षा संपली आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेच्या घोषणेची वाट पाहत होते. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी (6 रोजी) घोषणा केली. ‘रामायण पार्ट-1’ आणि ‘रामायण पार्ट-2’चीदेखील घोषणा केली आहे. या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांचीही घोषणा निर्माता नमित मल्होत्रा यांनी केली.

रणबीर कपूर, यश, साई पल्लवी हे कलाकार असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाच्या तारखांविषयी अधिकृत पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. याबाबत नमित मल्होत्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘एक दशकाहून अधिक काळपासून मी ही कहाणी पडद्यावर आणण्याची तयारी करीत आहे, जी पाच हजार वर्षांहून अधिक काळ कोट्यवधी मनांवर राज्य करीत आहे. आज ही घोषणा करून मी खूप खूश आहे. आपला इतिहास, आपली संस्कृती प्रतिबिंबित करणारे ‘रामायण’ लोकांसमोर आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हे महान महाकाव्य अभिमानाने आणि आदराने जिवंत करण्याचे स्वप्न पूर्ण करूया… रामायणचा पहिला भाग 2026 मध्ये आणि दुसरा भाग 2027 मध्ये येणार आहे.’ सोबतच त्यांनी ‘रामायण’ चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे.

‘गेम चेंजर’चा टीझर प्रदर्शित होणार

‘आरआरआर’नंतर राम चरणचे फॅन्स आता चित्रपट ‘गेम चेंजर’ची प्रतीक्षा करीत आहेत. या चित्रपटाचा टीझर याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये लॉन्च करण्याचे नियोजन केले आहे. या सोहळ्यात राम चरण स्वतः उपस्थित असेल आणि माध्यमांशी संवाददेखील साधणार आहे. तर, पुढील वर्षीच्या सुरुवातीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

राम चरण आणि कियारा आडवाणी यांचा तेलुगू चित्रपट ‘गेम चेंजर’ पुढील वर्षीच्या सुरुवातीला मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. हा चित्रपट हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निर्मात्यांनी कंबर कसली आहे. या चित्रपटाचा टीझर 9 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर, चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारीला तेलुगू, तामीळ आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दिल राजू यांनी ‘श्री व्यंकटेश्वर क्रिएशन्स’ या बॅनरअंतर्गत निर्मिती ‘गेम चेंजर’ चित्रपटात श्रीकांतस अंजली, एस.जे. सूर्या, नवीन चंद्रा, समुतिरकनी हे कलाकारही दिसतील.