सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आत्तापर्यंत 923 गुन्हे नोंदविण्यात आले असून, 843 जणांना अटक करण्यात आली आहे. तर, ९६ वाहने जप्त करीत तीन कोटी 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली.
निवडणुकीच्या काळात दारूविक्रीत मोठी वाढ होते. अनेकदा परराज्य-परजिल्ह्यांतून अवैधरीत्या दारू वाहतूक होण्याची शक्यता असते. या सर्व पाश्र्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत 1 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात 18 तात्पुरते चेक नाके उभारून कारवाई केली जात आहे. या पथकांकडून जिल्ह्यातील सर्व हातभट्टी दारूनिर्मिती, वाहतूक, विक्री, तसेच धाबे, अवैध ताडी धंदे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअन्वये 50 प्रस्ताव संबंधित दंडाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहेत. या इसमांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात येत असून, आतापर्यंत 12 प्रकरणांत नऊ लाख 80 हजार रुपये इतक्या रक्कमेची बंधपत्रे घेण्यात आली आहेत. या काळात गोवा निर्मित मद्याचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, या गुन्ह्यांमध्ये तीन लाख 64 हजार 170 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी अवैध मद्याची वाहतूक होणार नाही, तसेच मद्यविक्रीच्या आस्थापना विहित वेळेत बंद होतील, याकडे लक्ष देण्यात येत आहे. याशिवाय अल्पवयीन ग्राहकांना मद्यविक्री होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.
चरणसिंह राजपूत, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पुणे