झणझणीत तिखले, भरलेले खेकडे, झिंगा फ्राय अशा अस्सल चविष्ट कोळी खाद्यपदार्थांची चव चाखण्याची संधी खवय्यांना मिळणार आहे. निमित्त आहे ते वरळी सागरी कोळी महोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाचे. 8 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत वरळी सी फेस येथील स्व. बिंदुमाधव ठाकरे चौकासमोर हा महोत्सव भरणार आहे.
मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी बांधवांच्या खाद्यसंस्कृतीची सर्वांना ओळख व्हावी आणि ती टिकावी या उद्देशाने वरळी सागरी कोळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि सरचिटणीस आकर्षिका पाटील यांच्या वतीने हा महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येतो. कोळी महोत्सवाचे यंदाचे दहावे वर्ष असून दरवर्षी या महोत्सवाला मुंबईतील खवय्यांचा तुफान प्रतिसाद मिळतो. खाद्य महोत्सवासोबत तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांची रेलचेलदेखील असणार आहे. 8 नोव्हेंबरला सायंकाळी 7 वाजता मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. 9 नोव्हेंबरला ‘नाखवा माझा, दर्याचा राजा’ हा सुप्रसिद्ध कोळी गीतांचा कार्यक्रम तर 10 नोव्हेंबरला ‘खेळ खेळीला दर्यावरी’ हा कोळी नृत्याचा कार्यक्रम रंगणार आहे.