वार्तापत्र नागपूर- तीन थेट… दोन तिरंगी लढती, दक्षिण-पश्चिम, पश्चिम, दक्षिणमध्ये आमनेसामने; मध्य, उत्तरमध्ये परीक्षा, पूर्वमध्ये चौरंगीचे संकेत

>> महेश उपदेव

विधानसभेच्या निवडणुकीत राज्याच्या उपराजधानीत सहापैकी 3 ठिकाणी थेट लढत होण्याचे चित्र आहे. 2 ठिकाणी तिरंगी, तर एका ठिकाणी चौरंगीचे संकेत आहेत. दक्षिण-पश्चिममध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांच्यात थेट लढत होईल असे चित्र आहे. वंचितकडून विनय भांगे हा तरुण रिंगणात आहे. सर्वात कमी उमेदवार असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. फडणवीस विरुद्ध गुडधे-पाटील अशी अटीतटीची लढत होणार आहे.

पश्चिममध्येही विद्यमान आमदार व काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची लढत भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्याशी होईल. येथे काँग्रेस बंडखोर नरेंद्र जिचकार यांनी रंगत आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत. तिरंगी लढत होणार आहे .

दक्षिणमध्येही 2019मध्ये झालेली लढत याही वेळी दिसत आहे. भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार मोहन मते व काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव अशी थेट लढत होऊ शकते. येथे वंचितकडून माजी नगरसेविका सत्यभामा लोखंडे रिंगणात आहेत. ओबीसीबहुल असलेल्या या मतदारसंघात दलित मतदारांची संख्याही निर्णायक आहे.

मध्यमध्ये भाजपचे उमेदवार व विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके व काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके अशी थेट लढत दिसत आहे. मात्र काँग्रेस बंडखोर व माजी नगरसेवक रमेश पुणेकर यांनी हलबा समाजाच्या एकसंघाच्या बळावर रिंगणात उडी घेतल्याने निवडणुकीत रंगत आणली आहे. त्यामुळे येथील लढत तिरंगी होण्याचे चित्र आहे. उत्तर नागपूरमध्ये 2019मधील उमेदवार आमनेसामने आहेत. काँग्रेसकडून माजी मंत्री नितीन राऊत व भाजपकडून डॉ. मिलिंद माने समोरासमोर आहेत. मात्र काँग्रेसचे बंडखोर व बसपाकडून रिंगणात उतरलेले मनोज सांगोळे यांनी लढतीला चर्चेत आणले आहे. पूर्व नागपूरमध्ये मात्र चौरंगीचे चित्र आहे. भाजपची ताकद असलेल्या या मतदारसंघात विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांची बाजू सध्या वरचढ दिसत असली तरी मविआत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेलेल्या या जागेवरून पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे समोर आहेत. गेल्या वेळी 80 हजार मतदान घेणारे व काँग्रेसकडून बंडखोरी करणारे माजी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे व ज्येष्ठ माजी नगरसेविका तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आभा पांडेही या लढतीला चौरंगीच्या दिशेने घेऊन गेले आहेत.

सावनेरमध्ये थेट लढत असून काँग्रेसच्या अनुजा केदार व भाजपचे आशीष देशमुख रिंगणात आहेत. माजी मंत्री सुनील केदार यांचा हा मतदारसंघ असून त्यांच्या पत्नी येथून उमेदवार आहेत. या मतदारसंघात डॉ. अमोल देशमुख आपले सख्खे बंधू भाजपचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांच्याविरुद्ध निवडणूक लढत आहेत. कामठीतील प्रतिष्ठsच्या जागेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर अशी लढत होईल. काटोलमध्ये बहुरंगी लढतीचे चित्र आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची येथे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आग्रहामुळे त्यांनी मुलगा सलील देशमुख यांना रिंगणात उतरविले आहे. भाजपकडून चरणसिंग ठाकूर आहेत. शेकापचे राहुल देशमुख असून अनिल देशमुख यांना शह देण्यासाठी ‘डुप्लीकेट’ अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने रिंगणात उतरविले आहे. काँग्रेस बंडखोर याज्ञवल्क्य जिचकारही लक्ष वेधून घेत आहेत.

उमरेडमध्ये माजी आमदार भाजपचे सुधीर पारवे व काँग्रेसचे संजय मेश्राम अशी थेट लढत आहे. हिंगण्यातही भाजप उमेदवार व विद्यमान आमदार समीर मेघे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री रमेश बंग अशी थेट लढत होणार आहे.

मध्य नागपरमध्ये ‘विच्छा माझी पुरी करा’

मध्य नागपूर मतदारसंघात उमेदवारीवरून भाजप व काँग्रेसमध्ये चांगलेच घमासान झाले होते. भाजपकडून अखेरपर्यंत नाव पुढे आले नाही. शेवटी विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके यांना बाशिंग बांधले. तर काँग्रेसनेही बंटी शेळके यांच्यावर विश्वास टाकला. या मतदारसंघामध्ये या दोघांच्याही उमेदवारीवरून मात्र ‘विच्छा माझी पुरी करा’ अशी चर्चा रंगली आहे.

रामटेकमध्ये ‘सांगली पॅटर्न’

रामटेकमध्ये तिरंगी लढत होईल असे चित्र असून येथे ‘सांगली पॅटर्न’ साकारला जाईल, अशी जोरदार चर्चा आहे. काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या पाठीशी काँगेसजन असून माजी मंत्री सुनील केदार यांचीही येथे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिंदे गटाचे आमदार आशीष जयस्वाल, काँग्रेस बंडखोर राजेंद्र मुळक व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विशाल बरबटे अशी तिरंगी लढत होऊ शकते.