‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवाद आणि शह-काटशह असे राजकारण सुरू आहे. आता तर अजित पवार गटाने निवडणूक जाहीरनाम्यातून महिलांसाठी योजना जाहीर करताना मुख्यमंत्री हा शब्दच वगळला आहे. त्यामुळे महायुतीमधील बेबनाव पुन्हा एकदा पुढे आला आहे.
महायुतीमध्ये राजकीय कुरघोडी सुरू आहे. प्रत्येक योजनेचे श्रेय घेण्यामध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. खासकरून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे श्रेय घेण्यावरून महायुतीमधील तीन पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. आता तर अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यातून मुख्यमंत्री हा शब्दच गायब करून टाकला आहे. अजित पवार गटाचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. सध्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत महिलांना दीड हजार रुपये प्रतिमहिना दिले जातात. पण या योजनेवर कुरघोडी करण्यासाठी अजित पवार गटाने ही रक्कम 2 हजार 100 रुपये करण्याची घोषणा केली आहे. पण ही योजना जाहीर करताना त्यातील मुख्यमंत्री हा शब्द गायब करून लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे श्रेय घेण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे गटाच्या काही मंत्र्यांमध्ये वाद झाला होता.