हायकोर्टाने आरोपीला मंजूर केला चार दिवसांचा जामीन, आजारी वडिलांना भेटण्यास दिली परवानगी

अंथरुणाला खिळलेल्या वडिलांना भेटण्यासाठी उच्च न्यायालयाने एका आरोपीला चार दिवसांचा जामीन मंजूर केला. जामीन काळात आरोपीवर लक्ष ठेवा, असे आदेशही न्यायालयाने दिले.

दिवांगभाई कमलेशभाई रावल असे या आरोपीचे नाव आहे. 8 ऑक्टोबर 2024 रोजी फसवणुकीच्या गुह्यात पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. तो सध्या येरवडा कारागृहात आहे. रावलच्या वडिलांना अनेक व्याधी आहेत. अहमदाबाद येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सध्या ते अंथरुणाला खिळले आहेत. त्यांना भेटण्यासाठी तात्पुरता जामीन मंजूर करावा, अशी मागणी रावलने सुट्टीकालीन न्यायालयासमोर केली.

न्या. शाम चांडक यांच्या एकल पीठासमोर ही सुनावणी झाली. वडील आजारी असल्याने आधी महानगर दंडाधिकारी न्यायालय व नंतर विशेष न्यायालयात अर्ज करण्यात आला. या दोन्ही न्यायालयांनी जामीन नाकारला. त्यामुळे वडिलांना भेटण्यासाठी तरी उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी विनंती रावलकडून करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य केली.