पराभवाच्या धास्तीने मिंधे गटाने प्रतिस्पर्धी उमेदवारांचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी नाना कुरापती केल्याचे उघडकीस आले आहे. मिंधे गटाच्या उमेदवाराला फायदा करून देण्यासाठी अपक्ष उमेदवारांविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली, असा दावा करीत सोलापूर जिह्यातील दोघा अपक्ष उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर सुट्टीकालीन एकलपीठापुढे सुनावणी होणार आहे.
बार्शी मतदारसंघातील विजय जाधव आणि अक्षय दळवी या दोघा उमेदवारांनी अॅड. राजाभाऊ चौधरी यांच्यामार्फत याचिका दाखल केल्या आहेत. सोलापूरच्या उपविभागीय दंडाधिकाऱयांनी दोघांविरुद्व तडिपारीचा आदेश जारी केले. त्या आदेशांना दोघांनी आव्हान दिले आहे. तडीपारीची आदेश राजकीय षड्यंत्राचाच भाग आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठीच तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दोघांना सोलापूर आणि धाराशीव जिह्यांत प्रवेश करण्यास मनाई केली आहे. ही कारवाई करताना ज्या प्रकरणांचा संदर्भ दिला आहे, ती प्रकरणे फेरफार केलेली आहेत. त्यामुळे न्यायालयाने तातडीने सुनावणी घेऊन तडीपारीच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. असीम सरोदे यांनी केली. त्यांच्या विनंतीची दखल घेत न्यायालयाने दोघांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास तयारी दर्शविली. त्यानुसार एकलपीठापुढे सुनावणी होणार आहे.
राजकीय हेतूनेच तडीपारीचा आदेश!
बार्शी मतदारसंघातून मिंधे गटातर्फे राजेंद्र राऊत निवडणूक लढवत आहेत. त्यांना फायदा करून देण्यासाठीच आमच्याविरुद्ध तडीपारीचे आदेश काढले आहेत. आम्ही राऊत यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्या तक्रारीचा राग म्हणून निव्वळ राजकीय हेतूनेच तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप याचिकाकर्त्या अपक्ष उमेदवारांच्या वकिलांनी केला.