इमाने खलीफ निघाली बेईमान! ऑलिम्पिक सुवर्णविजेती महिला नव्हे, तर पुरुष वैद्यकीय अहवालातून झाले स्पष्ट

अल्जेरियन बॉक्सर इमाने खलीफने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकतर्फी वर्चस्व गाजवीत सुवर्णपदक जिंकले होते. 25 वर्षीय इमाने खलीफने महिलांच्या 66 किलो गटात सुवर्ण पदकाच्या लढतीत चीनच्या यांग लिऊचा पराभव केला होता, मात्र ऑलिम्पिकदरम्यान इमाने खलीफवरून

वाद समोर आला होता. आता एका वैद्यकीय अहवालातून इमाने खलीफ महिला नसून पुरुष असल्याचे उघड झालं आहे. इमाने खलीफच्या शरीरात ‘एक्स वाय’ गुणसूत्र असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ऑलिम्पिकच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

इमाने खलीफ आणि तैवानच्या लिन यू-टिंग या दोघांनाही लिंग चाचणीत अपयशी ठरल्याने गेल्या वर्षीच्या जागतिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले होते. परंतु असे असतानाही ‘आयओसी’ने इमाने खलीफला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली. खलीफने पहिल्याच सामन्यात इटलीच्या कारिनीचा पराभव केल्याने वादात सापडली.

एकतर्फी विजय

उंच असणाऱया इमाने खलीफने ऑलिम्पिकच्या संपूर्ण स्पर्धेत तिच्या ताकदीचा वापर केला होता. अंतिम सामन्यात इमाने खलीफने माजी विश्वविजेत्या यांग लिऊविरुद्ध चमकदार कामगिरी केली. इमाने खलीफने रिंगच्या मधूनच अनेक दमदार पंच लगावले. या सामन्यात खलीफने यांगला एकतर्फी लढतीत 5-0 फरकाने लोळविले.

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेनेही घातली होती बंदी

 इमाने खलीफच्या लिंगावर प्रश्न उपस्थित होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने 2023 मध्येही इमाने खलीफवर बंदी घातली आहे. तर दिल्लीतील बॉक्सिंग असोसिएशनने इमानेला जागतिक अजिंक्यपद सुवर्ण पदकाच्या सामन्यात सहभागी होण्यास बंदी घातली होती.